गेम खेळताना अचानक बंद पडले युवकाच्या ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:07 PM2021-09-08T20:07:47+5:302021-09-08T20:09:15+5:30
ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले.
ऑनलाईन गेममुळे रोज काही ना काही अपघात अथवा भयानक किस्से घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. परंतु चीनच्या हेनान प्रांतात एक अजब-गजब घटना घडली आहे. याठिकाणी जे घडलं त्यावर विश्वास ठेवणंही तुम्हाला कठीण जाईल. संपूर्ण रात्र जागून एक मुलगा गेम खेळत होता त्यानंतर तो मृत झाल्याचं आढळलं. परंतु त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला.
तोंडातून फेस आला अन् बेशुद्ध झाला
ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार २० वर्षाचा युवक झेंग्झो इंटरनेट बारमध्ये बेशुद्ध झाला. बारच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रात्रभर गेम खेळत राहिल्याने तो खुर्चीतून उठूच शकला नाही. त्याच्या तोंडातून अचानक फेस आला आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर हा युवक जमिनीवर कोसळला. ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. डॉक्टरांनी तपासले असता युवकाच्या ह्दयाचे ठोके बंद पडले होते आणि श्वासही थांबला होता. मात्र त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी एक शर्थीचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. कारण मुलगा बेशुद्ध होऊन थोडाच वेळ झाला होता.
डॉक्टरांनी असा वाचवला जीव
डॉक्टरांनी तातडीने त्या युवकावर उपचार सुरू केले. सर्वात पहिलं त्या युवकाला २० मिनिटं कार्डियोपल्मोनरी रिसिसिटेशन देण्यात आलं. त्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी एपिनेफ्रिन औषध दिलं. ज्यानंतर त्याचे ह्दयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉक्टरांनी तात्काळ आपत्कालीन उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवण्याचा निर्णय घेतला. या युवकावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
काय झालं होतं?
डॉक्टरांनी सांगितले होते की, हा युवक गेम खेळता खेळता अचानक पल्मोनरी एम्बोलिज्म अवस्थेत गेला होता. त्यामुळे त्याचे ह्दयाचे ठोके बंद झाले होते. या स्थितीत क्लॉटिंगमुळे रक्त फुफ्फुसांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पल्मोनरी एम्बोलिज्म लक्षणांमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, ह्दयाचे ठोके अनियमित होणे. दिर्घश्वास घेतेवेळी किंवा खोकल्याने छातीत दुखणे. खोकल्यासोबत रक्त येणे. सूज येणे, अंगात घाम येणे. शरीर थंड पडणे यासारखी लक्षणं आहेत.