मुलाला मृत समजत होती आई, बायकोनेही केल दुसरं लग्न; आता १२ वर्षांनी पाकिस्तानातून येणार परत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 01:26 PM2022-04-11T13:26:41+5:302022-04-11T13:31:13+5:30
Bihar : छवि नावाचा तरूण साधारण १२ वर्षाआधी पंजाबमधून भटकत पाकिस्तानच्या सीमेत शिरला होता. ज्यानंतर तेथील सेनेने त्याल अटक केली होती.
Bihar : बिहारच्या बक्सरमध्ये १२ वर्षाआधी जो मुलगा बेपत्ता झाल्यावर त्याच्या आईने त्याला मृत समजत त्याचा अंत्यसंस्कार केला होता. तो मुलगा १२ वर्षांनी पाकिस्तानच्या तुरूंगातून सुटून परत येत असल्याने आईच्या आनंदाला सीमा राहिली नाही. वयोवृद्ध आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत.
छवि नावाचा तरूण साधारण १२ वर्षाआधी पंजाबमधून भटकत पाकिस्तानच्या सीमेत शिरला होता. ज्यानंतर तेथील सेनेने त्याल अटक केली होती. आता पाकिस्तान सरकारकडून त्याला भारताकडे सोपवल्यानंतर बक्सर प्रशासन टीम त्याला आणण्यासाठी गुरदासपूरला रवाना झाली.
१२ वर्षाआधी जेव्हा छवि गायब झाला होता तेव्हा त्याच्या परिवाराला बरेच दिवस काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर तो मृत झाल्याचं गृहीत धरत त्याचा अंत्यसंस्कारही करण्यात आला. इतकंच काय तर त्याच्या पत्नीने दुसरं लग्नही केलं.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारकडून माहिती देण्यात आली होती की, छवि नावाच एक तरूण पाकिस्तानच्या तुरूंगात कैद आहे. सूचना मिळताच परराष्ट्र मंत्रालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून माहिती मागवली होती. पोलीस टीमने त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली.
छवि जिवंत असल्याचं ऐकल्यावर त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले होते. त्या म्हणाल्या की, त्यांनी हे मान्य केलं होतं की, त्यांचा मुलगा आता या जगात नाहीये. आता आस लागली आहे की, लवकरात लवकर त्यांचा मुलगा त्यांना भेटावा.
बक्सर जिल्हा प्रशासनाकडून छवि बेपत्ता झाल्याची माहिती घेतल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. गेल्या ५ एप्रिलला पाकिस्तान सरकारने त्याला अटारी बॉर्डरवर सिक्युरिटी फोर्सकडे सोपवलं. आता बीएसएफ त्याला गुरदासपूर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करणार.
गुरदासपूर जिल्हा प्रशासन द्वारे बक्सर जिल्हा पदाधिकारी यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. डीएम यांच्या आदेशावरून नीरज कुमार यांनी छविला आणण्यासाठी टीम तयार केली आणि ती गुरदासपूरला पाठवली. आता छवि लवकरच पुन्हा आपल्या परिवारासोबत असणार आहे.