मस्करीची कुस्करी! बिस्कीटातील क्रिम काढून लावलं टूथपेस्ट, १५ महिने तुरूंगवासाची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 12:24 PM2019-06-04T12:24:01+5:302019-06-04T12:27:53+5:30
एखाद्याची गंमत करणं कसं महागात पडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
(Image Credit : YouTube)
एखाद्याची खोड करण्याची किंवा गंमत करण्याची सवय अनेकांना असू शकते. कुणाची काही खोड केली तर घरातील मोठे लोक फार फार तर रागावतील आणि विसरतील. पण एका व्यक्तीला खोड काढणं इतकं महागात पडलं की, तुमचा विश्वास बसणार नाही. एका तरूणाने ओरिओ बिस्कीटातील क्रिम काढून त्यावर टूथपेस्ट लावलं. हे बिस्किट त्याने एका बेघर व्यक्तीला खाण्यासाठी दिलं. ज्याने हे केलं त्या तरूणाला यावरून १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे.
ही घटना स्पेनमधील असून इथे Kanghua Ren नावाचा एक यूट्यूबर आहे. त्याने एका ५२ वर्षीय रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला टूथपेस्ट लावलेले बिस्कीट दिले. त्याने ते खाल्ले सुद्धा. पण नंतर त्याला उलटी झाली. ती व्यक्ती लगेच पोलिसांकडे गेली आणि त्याने तरूणाची तक्रार केली. त्याने पोलिसांना सांगितले की, रस्त्यावर राहत असताना आजपर्यंत कुणीही त्याच्यासोबत अशी गंमत केली नाही.
झाली १५ महिन्यांची शिक्षा
'द न्यूयॉर्क टाइम्स' नुसार, रेन याला एका व्यक्तीचा सन्मान दुखावल्याप्रकरणी १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्पॅनिश कायद्यानुसार, पहिल्यांदा अहिंसक अपराध करणाऱ्या आरोपीला कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा दिली जाते. त्यानुसारच रेन याला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मस्करीची कुस्करी
रेन याने त्याचा बचाव करताना सांगितले की, 'हा व्हिडीओ केवळ एक गंमत म्हणून केला होता. नक्कीच ही गंमत बेकार होती. मी लोकांना हसवण्याचं काम करतो. लोकांना असे व्हिडीओज आवडतात'. रेनला २० हजार यूरो दंडही भरावा लागला.