पिझ्झा २८७ रुपयांचा पण झोमॅटोला पडला १० हजाराला! जाणून घ्या काय नेमकं प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 05:22 PM2022-08-25T17:22:13+5:302022-08-25T17:22:21+5:30
चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाने झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीला अजय शर्मा या ग्राहकाला १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण ३० दिवसांच्या आत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? जाणून घेऊया
ऑन टाईम फुड डिलिव्हरीचं वचन देणाऱ्या झोमॅटोला आता चांगलाच दणका मिळाला आहे. २८७ रुपयांचा पिझ्झा त्यांना १० हजार रुपयाला पडला आहे. चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाने झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीला अजय शर्मा या ग्राहकाला १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण ३० दिवसांच्या आत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? जाणून घेऊया
नेमकं प्रकरण काय?
अजय शर्मा यांनी झोमॅटो या फुड डिलिव्हरी अॅपवर २०२०मध्ये रात्री १०.१५ च्या दरम्यान पिझ्झाची ऑर्डर दिली. या पिझ्झाची किंमत २८७ रुपये होती. यावेळी वेळेत डिलिव्हरी करण्याचे १० रुपये अधिक लावण्यात आले. जवळजवळ १५ मिनिटांनी त्यांना ही ऑर्डर कॅन्सल झाल्याचा अन् त्याचे रिफंड मिळणार असल्याचा मेसेज आला.
त्यानंतर याबाबत शर्मा यांनी दिल्लीच्या ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्तांकडे तक्रार केली. पण त्यांची ही तक्रार रद्द करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांनी चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाकडे तक्रार दिली. या कक्षाने झोमॅटो या कंपनीला आता शर्मा यांना १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच झोमॅटोचं 'कभी तो लेट हो जाता' हे प्रमोशनल स्लोगन काढुन टाकायला सांगितलेलं आहे.
शर्मा यांनी इंडिया टुडेकडे याविषयी मत व्यक्त करताना म्हटलं की, '' वेळेत डिलिव्हरी करण्याचं वचन देऊन त्याचे १० रुपये अधिक आकारुन स्वत: हुनच ऑर्डर रद्द करणे हे अत्यंत अव्यावसायिक आहे.''