Asian Games 2018: सुवर्णविजेत्या इराणच्या कबड्डी प्रशिक्षिका आहेत महाराष्ट्राच्या मातीतल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 06:37 PM2018-08-24T18:37:37+5:302018-08-24T19:03:10+5:30
इराणच्या खेळाडूंनी चांगला खेळ केलाच, पण या विजयाच्या शिल्पकार ठरल्या आहेत त्या त्यांच्या प्रशिक्षिका.
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतावर पराभव करत सुवर्णपदक पटकावले. इराणच्या खेळाडूंनी चांगला खेळ केलाच, पण या विजयाच्या शिल्पकार ठरल्या आहेत त्या त्यांच्या प्रशिक्षिका. इराणच्या प्रशिक्षिका या महाराष्ट्राच्या मातीतल्या आहेत, हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रात बऱ्याच कबड्डीपटूंना घडवणाऱ्या शैलजा जैन या इराणच्या सुवर्णपदक विजेत्या संघाच्या प्रशिक्षिका आहेत.
शैलजा या महाराष्ट्रातल्या नाशिकला राहणाऱ्या आहेत. आतापर्यंत त्यांनी घडवलेल्या बऱ्याच खेळाडूंना पुरस्कारही मिळाले आहे. इराणने 2008 साली शैलजा यांच्याशी संपर्क साधला होता. पण त्यावेळी शैलजा या नोकरी करत होत्या. शैलजा निवृत्त झाल्या आणि इराणने पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मात्र शैलजा यांनी इराणला जायचे ठरवले.
इराणमध्ये गेल्यावर आहार ते वेशभूषा या साऱ्या गोष्टींमध्ये त्यांच्या आयुष्यात फरक पडला. पण यावेळी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य इराणने दिले होते. संघ निवडीपासून ते कोणत्या खेळाडूला कधी खेळवायचं, हे सारे निर्णय शैलजा घेत होत्या. त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे इराणने सुवर्णपदक जिंकले, असे शैलजा सांगत होत्या.