Asian Games 2018: भारत-इराण कबड्डीच्या सुवर्णपदकासाठी भिडणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:31 PM2018-08-23T15:31:54+5:302018-08-23T15:32:10+5:30
Asian Games 2018: भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
जकार्ता - भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आशियाई स्पर्धेतील महिला कबड्डी संघाच्या अंतिम फेरीत हे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. गुरूवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिलांनी चायनीज तैपेइचा 27-14 असा सहज पराभव केला, तर इराणने थायलंडचा 23-16 असा पराभव केला.
#AsianGames#TeamIndia Women's Kabaddi team is through to the Finals of the Kabaddi event of the #AsianGames2018 with a comfortable victory over Chinese Taipei by 27-14! #WellDone girls 🇮🇳👏👏#AllTheBest for the finals tomorrow! #IAmTeamIndiapic.twitter.com/dKsRPh3SGl
— Team India (@ioaindia) August 23, 2018
भारत आणि इराण यांच्यात 2014ची अंतिम फेरीचा सामना झाला होता आणि त्यात भारताने 31-21 अशा फरकाने विजय साजरा केला होता. आशियाई स्पर्धेतील सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय महिला संघाला यंदा इराण कडवी झुंज देण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे जेतेपदासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील हे निश्चित.
भारतीय महिलांनी 2010 आणि 2014 च्या आशियाई स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 2010 मध्ये भारताने थायलंडला नमवले होते, तर इराणला बांगलादेशसह संयुक्तपणे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावलेला आहे आणि त्यांनी 2014 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आठ वर्षांचा आढावा घेतल्यास इराणची कामगिरी बरीच सुधारली आहे. त्यामुळे सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधणे भारतासाठी इतकी सोपी गोष्ट नसेल.