Asian Games 2018: फेडरेशनच्या कलहामुळे आम्ही हरलो; भारतीय कबड्डी संघाच्या कर्णधाराचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:34 AM2018-08-27T08:34:58+5:302018-08-27T08:35:14+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुंबई - आशियाई स्पर्धेतील कबड्डीतील हक्काचे सुवर्णपदक जिंकण्यात भारतीय पुरुष व महिला संघाना अपयश आले. महिला संघाला रौप्य, तर पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष संघाची १९९० पासूनची आणि महिला संघाची २०१० पासूनची सुवर्णपदक जिंकण्याची परंपरा जकार्ता येथे खंडित झाली.
या अपयशाला भारतीय कबड्डी फेडरेशनमध्ये सुरु असलेले कलह जबाबदार असल्याची टीका महिला संघाची कर्णधार पायल चौधरीने केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक खुलासा केला. त्याचसोबत अंतिम लढतीत पंचांचे काही निर्णय चुकल्याचेही तिने सांगितले.
ती म्हणाली,' आशियाई संघ निवडीवरून काही माजी खेळाडूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा संघ निवड चाचणी घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आम्ही येथू सुवर्ण जिंकून परतलो असतो तरी त्याचा आम्हाला काहीच अतिरिक्त फायदा मिळणारा नव्हता आणि पुन्हा निवड चाचणी झाली असती, अशाही चर्चा सुरु होत्या. हे सर्व आम्ही आशियाई स्पर्धेला रवाना होणार त्याच दिवशी आम्हाला कळले. त्याचे मानसिक दडपण कुठेतरी संघातील प्रत्येक खेळाडूवर होते.'
भारताचे माजी खेळाडू होनप्पा सी गोवडा आणि एस राजराथनम यांनी संघ निवड करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.