गुजरातने उतरवली दिल्लीची ‘दबंगगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:21 AM2017-08-02T01:21:08+5:302017-08-02T01:21:15+5:30
आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो-कबड्डी लीगला दणदणीत सुरुवात करताना दबंग दिल्लीचा २६-२० असा धुव्वा उडवला.
हैदराबाद : आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो-कबड्डी लीगला दणदणीत सुरुवात करताना दबंग दिल्लीचा २६-२० असा धुव्वा उडवला. सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करताना गुजरातने आक्रमण आणि बचाव यांची सुंदर सांगड घातली.
गचिबोवली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इराणी खेळाडू मेराज शेखच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा गुजरातच्या झंझावातापुढे निभाव लागला नाही. सुकेश हेगडेच्या नेतृत्वाखाली खेळणाºया गुजरातने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दिल्लीच्या आव्हानातली हवा काढली. मेराज शेख अपयशी ठरल्याने दिल्लीवरील दडपण वाढत गेले. यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेत गुजरातने धमाकेदार विजयाची नोंद केली. मध्यंतराला गुजरातने १५-५ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. सुकेशसह राकेश नरवाल व सचिन यांनी आक्रमणात गुजरातला सातत्याने गुण मिळवून दिले. तसेच, इराणचा हुकमी बचावपटू फझेल अत्राचली याने भक्कम पकडींच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरविण्यात मोलाची कामगिरी केली. गुजरातने दिल्लीवर दोन लोण चढवून आपले वर्चस्व राखले. दिल्लीचा अनुभवी बचावपटू निलेश शिंदेने काही चांगल्या पकडी केल्या, परंतु त्याला इतर सहकाºयांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. अखेरची दोन मिनिटे असताना दिल्लीने गुजरातवर एक लोण चढवून पुनरागमनाचा प्रयत्न केला. पण, गुजरातकडे मोठी आघाडी असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. (वृत्तसंस्था)
यूपीचा तेलगूला दणका
यूपी योद्धा संघानेही आपल्या पदार्पणाच्या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद करताना बलाढ्य तेलगू टायटन्सचा ३१-१८ असा फडशा पाडला. सावध सुरुवातीनंतर केलेला आक्रमक खेळ यूपी संघाने अखेरपर्यंत कायम राखत सहज बाजी मारली. मध्यंतराला यूपीने १२-११ अशी नाममात्र आघाडी घेत आपले नियंत्रण राखले. मात्र यानंतर त्यांनी तुफानी खेळ करताना तेलगूच्या आव्हानातली हवा काढली. लीगमधील सर्वात महागडा खेळाडू आणि यूपीचा कर्णधार नितीन तोमरसह मूळचा मुंबईकर रिशांक देवाडिगा यांनी खोलवर चढाया करुन तेलगू संघाला हैराण केले. तसेच महेश गौडचा अष्टपैलू खेळ आणि नीतेश कुमारच्या भक्कम पकडी यूपीच्या विजयात निर्णायक ठरल्या.