भारतीय संघाचा डबल धमाका, पुरुष व महिला संघांनी पटकावले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 08:54 PM2017-11-26T20:54:40+5:302017-11-26T20:54:46+5:30
भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई करत ‘डबल धमाका’ केला.
गोरगान (इराण) : भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई करत ‘डबल धमाका’ केला. भारतीय पुरुषांनी अंतिम लढतीत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३६-२२ असे नमवले. दुसरीकडे, महिलांनी अपेक्षित सुवर्ण पटकावताना कोरियाचा ४२-२० असा फडशा पाडला.
इराण येथील गोरगान शहरात संपन्न झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुषांनी साखळी फेरीतही पाकिस्तानचा ४४-१८ असा धुव्वा उडवला होता. साखळी फेरीच्या तुलनेत अंतिम सामन्यात पाकिस्तानने चांगली लढत दिली. परंतु, कसलेल्या भारतीयांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मध्यंतरालाच भारताने २५-१० अशी एकतर्फी आघाडी घेत आपले सुवर्ण निश्चित केले होती. दुसºया सत्रामध्ये पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना थोडीफार झुंज दिली. यावेळी त्यांनी १२ गुण कमावताना भारताला केवळ एका गुणाने मागे टाकल होते. परंतु, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताने वर्चस्व कायम राखले.
प्रदीप नरवालसह, सुरेंदर नाडा, मनिंदर सिंग, अजय ठाकूर आणि संदीप नरवाल यांनी भारताच्या जेतपदामध्ये मोलाचे योगदान दिले. दरम्यान, उपांत्य फेरीत बलाढ्य इराणला धक्कादायकरीत्या २८-२४ असे नमविलेल्या पाकिस्तानकडून भारताला कडवी झुंज मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, भारताने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा पाक खेळाडूंना कबड्डीचे धडे दिले.
दुसरीकडे, महिलांनीही आपले आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्चस्व कायम राखले. मुंबईची अभिलाषा म्हात्रे हिच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारताच्या महिलांनी कोरियाचा ४२-२० असा २२ गुणांची दणदणीत पराभव करत दिमाखात बाजी मारली. मध्यंतराला १९-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने कमालीचे आक्रमण करताना कोरियाचे मानसिक खच्चीकरण केले. आक्रमणासह बचावामध्येही दमदार कामगिरी करताना भारताने कोरियाला रौप्य पदकावार समाधान मानण्यास भाग पाडले.