कबड्डी : अमरावती- अकोला संघाचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:34 PM2019-01-19T19:34:32+5:302019-01-19T19:34:58+5:30
महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
अमरावती : राधानगर येथील गाडगेगबाबा बहुउद्देशीय मंडळ व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस अमरावती, अकोला व तिवसा संघांनी गाजविला. शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सामने पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अलोट गर्दी केली होती. या तीन दिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रात्री रंगणार आहे.
पहिला सामना अमरावतीचे गाडगेबाबा क्रीडा मंडळ (२९) व नेताजी मंडळ (३७) यांच्यात रंगला. नेताजी मंडळाने ८ गुणांची आघाडी घेत सामना आपल्या पारड्यात पाडला. दुसºया सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ, तिवसा (४१) ने छत्रपती क्रीडा मंडळ, अमरावती (२६) वर एकतर्फी विजय मिळविला. बजरंग क्रीडा मंडळ, अमरावती (३०) व संभाजी क्रीडा मंडळ, दर्यापूर (२६) यांच्यात चुरशीचा सामना झाला. जीआरसी, कामठी (५१) ने संघर्ष, अमरावती (२३) वर दणदणीत विजय मिळविला. अमरावतीचे समर्थ (३३) व युवा नवरंग (१७) यांच्यातही एकतर्फी सामना झाला. संभाजी हिरंगी, वाशिम (३८) व जागृती अमरावती (२४) यांच्यात वाशीमच्या संघाने बाजी मारली. संभाजी क्रीडा मंडळ, दर्यापूर (२३) वर प्रशिक्षण संघ, अकोला (३२) ने विजय मिळविला. शिवाजी कोपरा संघ (२४) व विदर्भ, तिवसा (२३) यांच्यात काट्याची लढत झाली. छत्रपती संघ, अमरावती (४१) व युवा नवरंग अमरावती (३६) यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत सामना रंगला. स्पर्धेत पुरुष गटात २०, तर महिला गटात १२ संघ सहभागी झाले आहेत.