कबड्डी : सायली जाधवच्या अष्टपैलू खेळाने महात्मा गांधी स्पोर्ट्स उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:58 PM2018-12-20T17:58:20+5:302018-12-20T17:58:52+5:30
सायलीने या महत्वपूर्ण लढतीत पहिल्या चढाई पासूनच आक्रमक पवित्रा घेत तब्बल २१ गुणांची कमाई करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
मुंबई, २० डिसेंबर : राष्ट्रीय खेळाडू सायली जाधवच्या अष्टपैलू खेळामुळे महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार- नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत चेंबूरच्या नवशक्ती क्रीडा मंडळाचा ४९-१० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. सायलीने या महत्वपूर्ण लढतीत पहिल्या चढाई पासूनच आक्रमक पवित्रा घेत तब्बल २१ गुणांची कमाई करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. मध्यंतरालाच त्यांनी २८-४ अशी मोठी आघाडी घेतली आणि प्रतिस्पर्धी नवशक्ती संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. सायलीला करुणा रासम आणि स्नेहल चिंदरकर यांची मोलाची साथ लाभली. नवशक्ती तर्फे पूर्वा सकपाळ हिने थोडीफार चमक दाखविली. महिला गटाच्या आणखी एका लढतीत गोरखनाथ महिला संघाने ओम साई विरुद्ध ३३-२७ असा सहा गुणांनी विजय मिळविला. पहिल्या सत्रात ओम साई संघाने १६-१५ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात किरण बाटे, नीलम जगताप आणि अवंतिका मालपेकर यांच्या सांघिक प्रयत्नामुळे त्यांना विजय मिळविता आला. ओम साई संघाची अंशिता तांबे-सुचिता घाग चांगल्या खेळल्या.
प्रथम श्रेणी पुरुष गटातून चेंबूरच्या साहसी क्रीडा केंद्राने पार्ले स्पोर्ट्स क्लबला ३६-१८ असे हरवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अक्षय शिंदे आणि शुभम शिंदे यांनी चढाई – पकडीचा केलेला अप्रतिम खेळ निर्णायक ठरला. पूर्वार्धातच त्यांनी २७-१ अशी मोठी आघाडी घेतली आणि तीच अखेर निर्णायक ठरली. पार्ले स्पोर्ट्स संघाने अशोक माईव आणि ललित आचरेकर यांच्या सुंदर खेळामुळे उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण संघाला विजय मिळवून देण्यात तो पुरेसा ठरला नाही. याच गटातील आणखी एका लढतीत स्फूर्ती (जोगेश्वरी) संघाने शिवशंकर प्रतिष्ठानवर (घाटकोपर) ३६-२८ अशी मात केली. सुनील यादव आणि प्रतिक पवार हे या विजयाचे शिल्पकार ठरले. या लढतीचे विशेष म्हणजे शिवशंकरच्या विक्रांत नार्वेकर याने उत्तरार्धात दमदार चढाया करताना तब्बल २१ गुणांची कमाई केली पण त्याचे हे प्रयत्न अपुरे ठरले.
कुमार गटातून सुभाष उत्कर्ष आणि शूर संभाजी या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुभाष उत्कर्षने पार्ले स्पोर्ट्स क्लब संघाला ३०-२३ असे नमविले तर शूर संभाजी संघाने फायटर स्पोर्ट्स क्लब संघाविरुद्ध २८-१२ असा एकतर्फी विजय मिळविला. शूर संभाजी तर्पे विकास चौरासिया आणि नविन पैडीकलवा यांनी सुंदर खेळा केला.