कबड्डी : शूर संभाजी क्रीडा मंडळ अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:37 PM2018-12-23T15:37:32+5:302018-12-23T15:38:11+5:30
सन्नी यादव सर्वोत्तम खेळाडू, करिष्मा म्हात्रेच्या ‘करिष्म्याने’ ओम नवमहाराष्ट्र मंडळ अंतिम फेरीत
मुंबई : शूर संभाजी क्रीडा मंडळाने ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेतील कुमार गटात अजिंक्य पदाचा मान पटकावला. अंतिम फेरीत त्यांनी शिव मराठा स्पोर्ट्स क्लब संघावर ३६-१६ असा २० गुणांनी विजय मिळविला.
या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळा करणाऱ्या सन्नी यादव याच्या दमदार चढाया आणि शुभम पांचाळच्या अचूक पकडी यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. मध्यंतराच्या ठोक्यालाच प्रतिस्पर्धी संघावर लोन चढविणाऱ्या शूर संभाजीने १४-७ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. शिव मराठा संघाचा भरवशाचा खेळाडू सुमीत जाधव याने सुरुवातीला चांगल्या चढाया केल्या पण त्याच्या यशस्वी पकडी करणाऱ्या शूर संभाजी संघाने त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे बंद करून टाकले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शूर संभाजीच्या सन्नी यादव याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाई साठी सुमीत जाधवची तर पकडीसाठी शुभम पांचाळ याला गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून मोरया मित्र मंडळ यांची निवड करण्यात आली.
दरम्यान महिला गटात ओम नवमहाराष्ट्र मंडळ आणि महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी यांच्यात अंतिम फेरीची झुंज रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत करिष्मा म्हात्रेच्या ‘करिष्म्याने’ ओम नवमहाराष्ट्र मंडळ संघाने चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध ३४-३१ असा विजय मिळविला. पहिल्या सत्रात ओम नवमहाराष्ट्र मंडळाने १४-१३ अशी नाममात्र आघाडी घेतली असली तरी तनुजा पार्टेच्या दमदार चढायामुळे चेंबूर क्रीडा केंद्राने दुसऱ्या सत्रात आघाडी घेतली होती. शेवटच्या चार मिनिटा पर्यंत त्यांच्याकडे चार गुणांची आघाडी होती त्यावेळी त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र करिष्मा म्हात्रे हिने शेवटच्या क्षणी दोन चढायामध्ये दोन-दोन गुण वसूल करीत चेंबूर क्रीडा केंद्राच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. करिश्माच्या या खेळाचे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले तर मंचावर बसलेल्या शिल्पा अतुल सरपोतदार यांनी तिचा रोख एक हजार रुपये देवून गौरव केला. याच गटातील दुसरी उपांत्य लढत अगदीच एकतर्फी ठरली.
महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने संघर्ष विरुद्ध ३२-६ असा आरामात विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पहिल्या सत्रात त्यांनी २०-५ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. त्यांच्या सृष्टी चाळके आणि करुणा रासम यांनी चांगला खेळ केला.
पुरुष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब आणि उत्कर्ष या संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत साहसी क्रीडा मंडळ आणि जॉली स्पोर्ट्स क्लब या लढतीत प्रेक्षकांना रोमहर्षक खेळाची मेजवानी मिळाली. जॉलीचा हुकमी एक्का राष्ट्रीय खेळाडू नामदेव इस्वलकर याची पहिल्या सत्रात दोन वेळा सुपर पकड करून साहसी संघाने दोन-दोन गुणांची कमाई करीत मध्यंतराला १५-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र नामदेवने डोक शांत ठेवून खेळ करताना संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटची चढाई त्याने केली त्यावेळी त्यांच्या कडे २४-२२ अशी दोन गुणांची आघाडी होती. मात्र त्याने पाच सेकंद आधीच चढाई पूर्ण करून प्रतिस्पर्धी संघाला आणखी एक चढाई करण्याची संधी दिली आणि तेथेच घात झाला. सहसीच्या दर्शन वाघ याने ‘करो या मरो’ च्या अविर्भावात आक्रमक चढाई करताना खोलवर मुसंडी मारली आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्नात जॉलीचे तीन खेळाडू बाद झाले व साहसी संघाने एका गुणाने विजय मिळवत अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला.साहसीच्या विजयात सुरज गायकवाड आणि पराग मोरे यांनी चांगला खेळ केला तर जॉली तर्फे नामदेव इस्वलकर, विक्रम जाधव आणि अनिकेत पडेलकर चांगले खेळले. याच गटातील उत्कर्ष आणि नवमहाराष्ट्र मंडळ यांच्यातील उपांत्य लढत अगदीच एकतर्फी ठरली, उत्कर्ष संघाने ही लढत २९-१३ अशी सोळा गुणांनी जिंकली. नितीन घोगळे आणि ह्रीशिकेश घाडीगावकर यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. नवमहाराष्ट्रचे नितीश मोरे आणि हर्षद सावंत चांगले खेळले.