कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूरने मारली बाजी, अलिबागमध्ये राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:41 AM2017-10-27T02:41:25+5:302017-10-27T02:41:33+5:30
अलिबाग : किशोरवयीन कबड्डी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याने, तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने अजिंक्यपद पटकावले.
अलिबाग : किशोरवयीन कबड्डी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याने, तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाने अजिंक्यपद पटकावले. कोल्हापूरच्या मुलांनी परभणी जिल्ह्याच्या मुलांचा ३६-१९ असा पराभव केला. तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी कोल्हापूर जिल्ह्याच्या मुलींचा २७- २३ असा पराभव केला.
अलिबाग येथील पीएनपी शैक्षणिक संकुल वेश्वी तेथे सलग तीन दिवस ही स्पर्धा पार पडली. किशोरवयीन मुले आणि किशोरवयीन मुलींचे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे संघ या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सकाळच्या सत्रात बाद फेरीतील सामने खेळविण्यात आले. यामध्ये किशोरवयीन मुले गटात मुंबई उपनगर विरु द्ध सातारा, नंदुरबार विरु द्ध रायगड, सांगली विरुद्ध पुणे आणि नाशिक विरुद्ध सोलापूर असे सामने खेळविण्यात आले. तर किशोरवयीन मुलींच्या सामन्यांमध्ये रायगड विरुद्ध परभणी आणि पुणे विरु द्ध रत्नागिरी असे सामने खेळविण्यात आले. सर्व फेºया संपल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात आले.
किशोरवयीन मुलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये परभणी जिल्हा विरु द्ध मुंबई शहर आणि ठाणे विरु द्ध कोल्हापूर जिल्हा अशा लढती रंगल्या. परभणी विरुद्ध मुंबई शहर या सामन्यात सुरुवातीच्या सत्रात मुंबई शहराच्या चढाईपटूंनी आपली दिमाखदार कामगिरी केली आणि आघाडी घेतली होती; परंतु परभणीच्या चढाईपटू आणि बचावफळीने उत्कृष्ट पकड करीत मुंबई शहरच्या कबड्डीपटूंना जेरीस आणले आणि सामना संपताना ४ गुणांनी विजय संपादन केला. परभणी जिल्हा संघाने २७ तर मुंबई शहरच्या संघाने २३ गुण पटकावले होते.
मुलांची दुसरी सेमिफायनल प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी ठरली. हा सामना बलाढ्य कोल्हापूर आणि ठाणे या संघात झाला. या सामन्यात कोल्हापूरच्या खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड सुरुवातीपासूनच ठेवली.
मध्यान्हाच्या काळात ठाणे संघाने गेममध्ये परत येण्याचा प्रयत्न केला. काहीअंशी हा प्रयत्न यशस्वी ठरला. नंतर मात्र कोल्हापूरच्या खेळाडूंनी चांगला खेळ खळत प्रेक्षकांची मने जिंकली. हा सामना कोल्हापूर संघाने १४ गुणांनी जिंकला. कोल्हपूर संघाने ४५ तर ठाणे संघाने ३१ गुणांची कमाई केली.
किशोरवयीन मुलींच्या सेमिफायनलमध्ये मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई उपनगर संघाने ३ गुणांनी विजय संपादित केला. मुंबई उपनगर संघाने ३८ तर मुंबई शहरच्या संघाने ३३ गुण कमावले. दुसरा सेमिफायनलचा सामना कोल्हापूर आणि पुणे या संघात झाला.
पुणे संघातील मुलींनी आपला दिमाखदार खेळ दाखवीत कोल्हापूर संघाला झुंजवले. अखेर कोल्हापूर संघाने ४३ गुण, तर पुणे संघाने २६ गुणांची कमाई केली. या सामन्यात कोल्हापूर संघ १७ गुणांनी विजयी झाला.
मुलींचा अंतिम सामना मुंबई उपनगर विरु द्ध कोल्हापूर यांच्यात झाला. सामन्यात मुंबई उपनगर संघाने कोल्हापूरच्या चढाईपटूंना थोपवून धरत अजिंक्य पद पटकावले. या सामन्यात मुंबई उपनगरच्या संघाने २७ गुण, तर कोल्हापूरने २२ गुण पटकावले. त्यामुळे मुंबई उपनगरने निसटता विजय मिळविला.
मुलांचा अंतिम सामना कोल्हापूर संघाने जिंकला. अंतिम सामन्यावर कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपली पकड कायम ठेवत सामना सहज खिशात घातला.
कोल्हापूर संघाने परभणीचा १७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात कोल्हापूर संघाने ३९ तर परभणी संघाने १९ गुण पटकावले.
मुलींचा अंतिम सामना मुंबई उपनगर विरु द्ध कोल्हापूर यांच्यात झाला. सामन्यात मुंबई उपनगर संघाने अजिंक्य पद पटकावले.