राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्रापुढे विजेतेपद राखण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:24 PM2019-01-27T18:24:27+5:302019-01-27T18:25:20+5:30
या संघाची आठ गटात विभागणी करण्यात येणार असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.
मुंबई : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.आणि रायगड जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने २८जानेवारीपासून ६६व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रायगड-रोहा येथील म्हाडा कॉलनीच्या मैदानावर मॅटच्या चार क्रीडांगणावर हे सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेत महासंघाला संलग्न असलेले २८राज्याचे संघ व सेनादल, भारतीय रेल्वे, बीएसएनएल हे व्यावसायिक युनिट असे ३१संघ सहभागी होणार आहेत. या संघाची आठ गटात विभागणी करण्यात येणार असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.
रायगड मधील कबड्डीची लोकप्रियता पहाता बनविण्यात आलेली दहा हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी देखील कमी पडेल असे वाटते. सहभागी संघाची संख्या पहाता सामने सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येतील. स्पर्धेची तयारी जोरदारपणे सुरू असून परराज्यातील संघाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. त्रिपुराच्या संघाचे रोह्यात दोन दिवसांपूर्वी प्रथम आपली हजेरी लावली. आज दुपार पर्यंत सर्व संघ रोह्यात दाखल होतील असा अंदाज आहे.गतविजेत्या महाराष्ट्राचा अ गटात समावेश असून उपविजेत्या सेनादलाने ब गटात स्थान मिळविले आहे. स्पर्धेची गटवारी अजून जाहीर झाली नसून ती आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.