कबड्डी खेळताना सर्व्हिस टाकायला गेलेला खेळाडू अचानक बेशुद्ध; मैदानात जीव सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 08:40 AM2021-11-06T08:40:01+5:302021-11-06T08:40:18+5:30
कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील घटना; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
जयपूर: राजस्थानच्या टोंकमध्ये कबड्डी खेळताना एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नवरंगपुरात एका कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एक खेळाडू सर्व्हिस टाकण्यासाठी गेला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी त्याची पकड घेतली. काही सेकंदांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला सोडलं. मात्र तो बेशुद्ध पडला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नवरंगपुरामध्ये १ नोव्हेंबरपासून ३ दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी चाकसू आणि बोरखंडी संघांमध्ये अंतिम सामना होता. रात्री ८ वाजता सामन्याला सुरुवात झाली. चाकसू संघाकडून दामोदर गुर्जर (वय २१ वर्षे) सर्व्हिस टाकायला गेला. दामोदर गुर्जर बौंलीमधल्या रंवासा गावचा रहिवासी आहे.
दामोदर सर्व्हिससाठी गेला असताना प्रतिस्पर्ध्यांनी त्याला घेरलं. पंचांनी दामोदरला आऊट दिलं. त्यानंतर खेळाडूंनी दामोदरला सोडलं. मात्र त्यानंतरही तो उठला नाही. उपस्थित खेळाडू आणि आयोजकांनी दामोदरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो शुद्धीवर आला नाही. त्यानंतर दामोदरला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नवरंगपुरामध्ये १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान तरुणांसाठी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बिसलपूर प्रकल्पाचे एडीएम प्रभातीलाल जाट यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका खेळाडूचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. दिवाळीच्या तोंडावर तरुण मुलगा गमावल्यानं दामोदरच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.