पंतप्रधानांनी केले सोनाली हेळवीचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:53 AM2019-01-28T05:53:15+5:302019-01-28T05:53:38+5:30
‘खेलो इंडिया’त पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे जीवन प्रेरणादायक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवी हिचा आकाशवाणीवरील प्रसारित ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला. त्याचप्रमाणे खेलो इंडियातील चांगली कामगिरी करणाºया खेळाडूंचेही मोदी यांनी कौतुक केले.
मोदी म्हणाले, न्यू इंडियाच्या निर्माणात फक्त मोठ्या शहरांतील लोकांचेच नव्हे, तर छोटे शहर, खेड्यापाड्यांतून येणारे युवा, मुलांच्या क्रीडा गुणवत्तेचेदेखील खूप मोठे योगदान आहे, हेच खेलो इंडियातून स्पष्ट होत आहे. त्यांनी सांगितले की, जानेवारीत पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत १८ खेळांत जवळपास ६ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो तेव्हा तो जागतिक पातळीवरही सर्वोत्तम कामगिरी करील. या वेळेस ‘खेलो इंडिया’ प्रत्येक राज्यातील खेळाडूंनी आपापल्या पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. पदक जिंकणाºया अनेक खेळाडूंचे जीवन जबरदस्त प्रेरणादायक ठरले आहे. याविषयी पंतप्रधानांनी बॉक्सिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारा खेळाडू आकाश गोरखा याचा उल्लेख केला. आकाश याचे वडील पुणे येथे एका कॉम्प्लेक्समध्ये गार्डचे काम करीत आहेत आणि ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात.
‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी २१ वर्षांखालील महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवी हिचा उल्लेख केला. सोनालीने खूप कमी वयात आपल्या वडिलांना गमावले आणि तिचा भाऊ व आईने सोनालीच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. आसनसोलचा १० वर्षीय अभिनव शॉ हा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला. कर्नाटकातील बेळगाव येथील शेतकºयाची मुलगी अक्षता बासवानी कमती हिनेदेखील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याचे त्यांनी सांगितले. अक्षताने यशाचे श्रेय तिच्या वडिलांना दिले.