प्रो कबड्डी : पाटणा पायरेट्सचा दमदार विजय, कर्णधार प्रदीपचा एकहाती दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:47 AM2017-08-04T02:47:22+5:302017-08-04T02:47:28+5:30
सलग दुस-या सामन्यात कर्णधार प्रदीप नरवालने केलेल्या झंझावाती आक्रमणाच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दुसºया विजयाची नोंद करताना तेलुगू टायटन्सचा ४३-३६ असा धुव्वा उडवला.
हैदराबाद : सलग दुस-या सामन्यात कर्णधार प्रदीप नरवालने केलेल्या झंझावाती आक्रमणाच्या जोरावर गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दुसºया विजयाची नोंद करताना तेलुगू टायटन्सचा ४३-३६ असा धुव्वा उडवला. सलग पाचव्या सामन्यात तेलुगूला पराभवाचा सामना करावा लागला.
पाटणाने तुफान आक्रमक खेळ करताना सामना एकतर्फी केला. मध्यंतरालाच पाटणाने २६-१६ अशी दहा गुणांची मजबूत आघाडी घेत सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकविला. प्रदीपने निर्णायक चढाई करताना १२ गुणांची वसुली करत तेलुगूच्या आव्हानातली हवा काढली. तसेच, मोनू गोयतनेही आक्रमणात १० गुण मिळवताना प्रदीपला चांगली साथ दिली. विनोद कुमार व जयदीप यांनी बचावामध्ये प्रत्येकी ४ गुण घेत तेलुगूच्या चढाईपटूंच्या दमदार पकडी केल्या. कर्णधार राहुल चौधरीची झुंज अपयशी ठरली. एकूण १२ गुण मिळवले. अनुभवी राकेश कुमारनेही अष्टपैलू खेळ करताना ६ गुण कमावले. (वृत्तसंस्था)