सिद्धार्थ देसाईसाठी रंगली चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:05 AM2019-04-09T07:05:49+5:302019-04-09T07:05:51+5:30
कबड्डी लीग लिलाव; तेलगू टायटन्सने मोजले १ कोटी ४५ लाख रुपये
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या मागील सत्रात आपल्या तुफानी खेळाने सर्वांचे लक्ष वेधलेल्या सांगलीच्या सिद्धार्थ देसाई याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी लीगच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वच संघांमध्ये चुरस रंगली. यामध्ये तेलगू टायटन्सने बाजी मारताना या आक्रमक खेळाडूला तब्बल १ कोटी ४५ लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.
सिद्धार्थने गेल्या हंगामात यू मुंबाकडून खेळताना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे, यंदा सिद्धार्थसाठी मोठी चुरस रंगली. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवलेल्या मोनू गोयतचा विक्रम मागे टाकण्यात सिद्धार्थला ६ लाख रुपयांनी अपयश आले. गेल्या वर्षी लिलाव प्रक्रियेमध्ये मोठा भाव खालेल्या मोनू गोयतला यंदा हरियाणा स्टीलर्सने कायम ठेवले नाही. यूपी योद्धाने ९३ लाख रुपयांची किंमत मोजून गोयतला आपल्या चमूमध्ये समाविष्ट करून घेतले.
याशिवाय नितीन तोमर, राहुल चौधरी आणि अष्टपैलू संदीप नरवाल या अन्य स्टार खेळाडूंवरही मोठ्या बोली लागल्या. नितीन तोमरला पुणेरी पलटनने १ कोटी २० लाखांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. तामिळ थलाइवाने राहुल चौधरीसाठी ९४ लाख, तर यू मुंबाने संदीप नरवालसाठी ८९ लाख रुपये मोजले.
१९ जुलैपासून रंगणार कबड्डी लीगचा थरार
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या सत्राची रंगत १९ जुलै ते ९ आॅस्टोबर दरम्यान रंगणार असल्याची माहिती प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी दिली. ‘देशांतील सणांचा कालावधी लक्षात घेता यंदाच्या सत्रातील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला,’ असेही गोस्वामी यांनी सांगितले.
गोस्वामी यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी लीगचे सहावे सत्र आॅक्टोबर महिन्यात सुरु झाले होते. मात्र यंदा आम्ही जुन्या वेळापत्रकाप्रमाणे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी देखील जुलै महिन्यातच कबड्डी लीग खेळविण्यात येईल.’ दरम्यान, सोमवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रीयेमध्ये १३ देशांतील एकूण ४४१ खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये ३८८ खेळाडू भारतीय, तर ५८ विदेशी खेळाडू समाविष्ट होते.