राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : राजमाता जिजाऊ, अंकुर संघांना जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 10:03 PM2018-11-19T22:03:58+5:302018-11-19T22:05:06+5:30
अपेक्षा टाकळे, सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
मुंबई : पुण्याच्या राजमाता जिजाऊने मुंबईच्या शिवशक्तीवर ३१-२७ असा विजय मिळवीत शिवाई प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिलांत शिवाई चषक पटकावला. पुरुषांत अंकुरने अमरचा ४०-२५ असा पराभव करीत शिवाई चषकावर आपले नाव कोरले. शिवशक्तीची अपेक्षा टाकळे महिलांत, तर अंकुरचा सुशांत साईल पुरुषांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोघांना प्रत्येकी २१ इंचाचा रंगीत दूरदर्शन संच देऊन सन्मान करण्यात आला.
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरलेल्या या सामन्या पहिल्या डावात राजमाताकडे १२-०८ अशी नाममात्र आघाडी होती. शेवटी हीच आघाडी त्यांच्या कामी आली. राजमाता, शिवशक्ती, महात्मा गांधी हे तिन्ही महिला संघ आपल्या पूर्ण ताकदीने या स्पर्धेत उतरले होते. राजमाताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत सातत्याने आघाडी आपल्याकडे कशी राहील याची काळजी घेत हा विजय साकारला. सायली केरीपाळेचा अष्टपैलू खेळ त्याला स्नेहल शिंदे, नेहा घाडगे यांची मिळालेली चढाईची, तर पालवी जमदाडे, अंकिता जगताप यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. दुसऱ्या डाव आक्रमकतेने खेळला गेला. क्षणा क्षणाला चकमकी झडत होत्या.शेवटी उत्कंठा ताणल्या गेलेल्या या सामन्यात पुण्याने बाजी मारली. पूजा यादव, अपेक्षा टाकळे, पौंर्णिमा जेधे यांनी दुसऱ्या डावात शर्थीची लढत दिली. पण पहिल्या डावातही आघाडी काय त्यांना कमी करणे जमले नाही. येथेच त्यांचा पराभव निश्र्चित झाला.
पुरुषांचा अंतिम सामना तसा एकतर्फीच झाला. मुंबईतील हे दोन्ही संघ सातत्याने एकमेकांसमोर येत असतात. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांच्या खेळाचा अंदाज होताच. त्याचाच फायदा उठवीत अंकुरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत विश्रांतीपर्यंत १८-१०अशी आश्वासक आघाडी घेतली होती. सुशांत साईल, अजय देवाडे यांच्या झंजावाती चढाया त्याला किसन बोटे, मिलिंद कोलते यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. उत्तरार्धात हाच जोश कायम राखत त्यांनी विजयाचा कळस चढविला. संकेत सावंत, रोहित अधटराव, नितीन विचारे यांचा खेळ या सामन्यात त्यांच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. त्यामुळे अमरला या पराभवाचा सामना करावा लागला.
या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात राजमाताने महात्मा गांधीला ४२-२८ असे, तर शिवशक्तीने डॉ.शिरोडकरला ३६-१२असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. या उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. सात हजार प्रदान करण्यात आले.पुरुषांत अंकुरने ओम कबड्डीला ४३-२२ असे, तर अमरने विजय बजरंगला ३६-२०असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या दोन्ही उपांत्य उप विजयी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. दहा हजार देऊन सन्मानित करण्यात आले. रोहित अधटराव, संकेत सावंत या अमर क्रीडा मंडळाच्या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेतील अनुक्रमे चढाई व पकडीचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. महिलांत हा मान महात्मा गांघीच्या पूजा किणी (चढाई) व राजमाताच्या सायली केरीपाळे (पकड) यांनी मिळविला. या चारही खेळाडूंना प्रत्येकी एक-एक पॉवर कुलर प्रदान करण्यात आले. या मोसमातील ही मुंबईतील पहिलीच राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे सामने पहाण्यासाठी तुफान गर्दी झाली होती.