ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, राजमाता जिजाऊ विजेते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 06:22 PM2018-01-11T18:22:50+5:302018-01-11T18:25:10+5:30
ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, मुंबई तर महिला गटात राजमाता जिजाऊ, पुणे या संघांनी विजेतेपद पटकावले.
ठाणे - ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, मुंबई तर महिला गटात राजमाता जिजाऊ, पुणे या संघांनी विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विदयामाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष व्यावसायायिक18 संघ व महिलाचे 18 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम लढतीत एअर इंडिया-मुंबई आणि युनियन बँक-मुंबई आमनेसामने होते. यात एअर इंडिया-मुंबईने 37 गुणांनी एकतर्फी विजय संपादित करत विजेतेपदावर कब्जा केला. एअर इंडियाकडून सिध्दार्थ देसाई, मोनू यांनी उत्कृष्ट चढाईचे प्रदर्शन केले. तर उमेश म्हात्रे, विकास काळे यांनी भक्कम बचाव करताना उत्तम पकडी केल्या.
तर महिला गटामध्ये पुण्याचा राजमाता जिजाऊ संघ आणि शिवशक्ती-मुंबई शहर या संघांमध्ये अंतिम लढत रंगली. या सामान्यात राजमाता जिजाऊ-पुणे संघाने 12 गुणांनी विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत शिवशक्ती-मुंबई यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली. मात्र राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या राजमाता जिजाऊ पुणे संघातील सायली किरपाळे, सलोनी गजमल यांनी उत्तम चढाई केली. तर पकडीची साथ मानसी सावंत व पुनम साठे यांनी दिल्याने राजमाता जिजाऊ-पुणे संघाने विजय खेचून आणला.
महापौर सौ.मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा परबवाडी येथील शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी, येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवशी मा एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (बांधकाम उपक्रम) महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री-ठाणे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक-विधान परिषद, मा.महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.