टायटन्सने बुल्सला रोखले, स्टीलर्सचा पहिला विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:42 AM2017-08-09T02:42:49+5:302017-08-09T02:43:15+5:30
अखेरच्या ५४ सेकंदात कर्णधार राहुल चौधरी याने केलेल्या चढाईत दोन गुण मिळविताच तेलगू टायटन्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात मंगळवारी ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरु बुल्सला २१-२१ असे बरोबरीत रोखले.
किशोर बागडे
नागपूर : अखेरच्या ५४ सेकंदात कर्णधार राहुल चौधरी याने केलेल्या चढाईत दोन गुण मिळविताच तेलगू टायटन्सने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात मंगळवारी ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरु बुल्सला २१-२१ असे बरोबरीत रोखले.
कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात एका गुुणाने आघाडीवर असलेल्या बंगळुरु संघाचे मोक्याच्या क्षणी डावपेच फसल्याने संघाच्या विजयाचा घास हिसकावला गेला.
तेलगू टायटन्सला यंदाच्या पर्वात सलग दुसऱ्यांदा धूळ चारण्याची संधी बंगळुरु बुल्सकडे होती. पण संयम न पाळल्याने होमग्राऊंडवर सलग दोन पराभवानंतर विजयी पथावर परतण्याची संधी त्यांनी गमावली. सामना बरोबरीत सुटताच टायटन्स संघ सातव्या लढतीत सहाव्या पराभवापासून बचावला. त्याआधी मध्यंतरापर्यंत बंगळुरुचे नऊ आणि टायटन्सचे आठ गुण होते. टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरी याने आठ गुणांची तर बंगळुरुचा कर्णधार रोहित कुमार याने पाच गुणांची भर घाातली. चढाईतून १४ गुण संपादनन करणाºया टायटन्सच्या खेळाडूंनी पकडीतूनही सहा गुणांची कमाई केली.
त्याआधी, पहिल्या लढतीत मोहित चिल्लर आणि विकास कंडोला यांच्या चढाई तसेच पकड या दोन्ही आघाड्यांवरील उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर हरियाना स्टीलर्सने ‘अ’ गटाच्या सामन्यात गुजरात फार्च्युन जायंट्सचा ३२-२० अशा फरकाने पराभव करीत तिसºया सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली. याआधी हरियाना संघ मुंबईकडून पराभूत झाला होता. त्यांचा दुसरा सामना अनिर्णीत सुटला.
उत्कृष्ट रेडर ठरलेल्या विकास कंडोलाने सहा आणि सामनावीर ठरलेला मोहित चिल्लर यााने सात गुणांची कमाई केली. सुरजीतसिंगने तीन आणि वझीरसिंंग याने दोन गुणांचे योगदान दिले. पराभूत गुजरातसाठी सचिनने सर्वाधिक आठ, महेंद्रसिंग राजपूतने पाच आणि इराणचा खेळाडू अबोझर मिघानी याने तीन गुण नोंदविले. अबुझरवर सहकारी खेळाडूंना भडकविल्याचा ठपका ठेवून सामनाधिकाºयाने अखेरच्या पाच मिनिटांचा खेळ शिल्लक असताना मैदानाबाहेर काढले. फझल अत्राचली हा दुसरा इराणी खेळाडू सपशेल अपयशी ठरला.
दोन्ही संघांनी चांगली झुंज दिली पण मोक्याच्याक्षणी स्टीलर्सच्या चढाईपटूंनी बाजी मारली. त्यांनी प्रत्येकी वेळी गुण वसूल केल्याने मध्यंतरानंतर गुजरात संघ पहिल्या नऊ मिनिटांच्या खेळात आॅल आऊटदेखील झाला. नाणेफेकीचा कौल बाजूने येताच हरियाना स्टीलर्सकडून पहिल्याच चढाईत सुरजीतने दोन गुणांची कमाई केली. दुसरीकडे गुजरातनेही स्वत:ला सावरून तीन उत्कृष्ट पकडींसह गुुण संख्या वाढविण्यावर भर दिला. त्यामुळे पहिल्या दहा मिनिटांत उभय संघ १०-१० असे
बरोबरीत होते. त्यानंतरही हरियानाच्या खेळाडूंनी चढाई आणि पकडीमध्ये चमकदार कामगिरी करीत मध्यंतरापर्यंत गुजरातवर १३-९ अशी आघाडी संपादन केली होती. हरियानाला चढाई आणि
पकडीतून क्रमश: सहा आणि पाच गुण तर गुजरातला प्रत्येकी पाच गुणांची कमाई झाली.
पटणा पायरेट्सला साधायचीय हॅट्ट्रिक : नरवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गत दोन मोसमांत विजेतेपद मिळविल्यानंतर चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवीत पटणा पायरेट्सला प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातही जेतेपदासह हॅट्ट्रिक साधायचीय, असा आशावाद संघाचा कर्णधार प्रदीप नरवाल याने व्यक्त केला आहे.
कबड्डीचा जन्मजात वारसा लाभलेल्या २० वर्षांच्या प्रदीप नरवालने पाचव्या पर्वात पायरेट्सच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत तब्बल ४२ गुणांची कमाई केल्यामुळे ‘स्टार आॅफ द वीक’ हा सन्मानदेखील पटकाविला.
‘डुपकी’साठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रदीपला मैदानात चढाईत बचावात मोनू, विजय आणि विकास यांची साथ लाभते. बचावात विनोद कुमार, जयदीप, मनीष आणि संदीप हे तर अष्टपैलू म्हणून अरविंद कुमार हे सहकारी संघाच्या यशात मोलाचे योगदान देत असल्याचे प्रदीपने सांगितले. नागपुरात यजमान बंगळुरूबुल्सवर एकतर्फी विजय नोंदविल्यानंतर अहमदाबाद येथे पटणा पायरेट्स संघ सराव करीत आहे. त्यांची पुढील सामन्यात गाठ पडेल ती यूपी योद्धासोबत. ‘लोकमत’शी दूरध्वनीवर बोलताना २०१६ च्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाºया प्रदीपने कुटुंबात किमान सात जण कबड्डी खेळत असल्याचे सांगितले. हरियानाच्या नरवाल गावातील अनेक खेळाडू भारतीय कबड्डीला लाभले आहेत. कबड्डीने आयुष्याला कलाटणी मिळाली असून कबड्डी लीगमधून चांगला पैसा आल्याचे समाधान व्यक्तकरीत प्रदीपने आयकर विभागात नोकरीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.