कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर
By मुरलीधर भवार | Published: December 30, 2023 05:11 PM2023-12-30T17:11:20+5:302023-12-30T17:11:38+5:30
प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे.
कल्याण-कल्याणमधील एका भटक्या कुत्र्याच्या पाठीतून दीड किलो वजनाचा ट्यूमर काढण्यात आला आहे. पॉज या प्राणी मित्र संस्थेच्या मदतीने त्या भटक्या कुत्र्या मुरबाड येथील प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे.
पॉज ही समाजिक संस्था ठाणे जिल्हयात २३ वर्षापासून कार्यरत आहे. कल्याण डाेंबिवली ते बदलापूर परिसरात ही संस्था पशू कल्याण, वन्यजीव पुनर्वसनाकरीता काम करीत आहे. गेल्या आठवड्यात पॉजच्या हेल्पलाइन ला एका श्वानाबद्दल कॉल आला. पॉजचे स्वयंसेवक देवेंद्र निलाखे आणि जयश्री या दोघांनी त्या भटक्या कुत्र्याला पॉज संस्थेच्या मुरबाड येथील पशू रुग्णालयात दाखल केले. मुरबाडचे पशु रुग्णालय हे अख्ख्या ठाणे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय आहे की जिथे केवळ भटक्या, वेवासर आणि देशी कुत्र्यांवर उपचार केले जातात. या भटक्या कुत्र्याच्या शस्त्रक्रियेकरीता कोणतीही आर्थिक मदत घेण्यात आली नाही. त्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक निलेश भणगे यांनी दिली आहे.
संस्थेच्या विश्वस्त अनुराधा रामस्वामी यांनी सांगितले की, अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही संस्थेकडे लगेच सर्व गोष्टी उपलब्ध नसतात. मात्र पॉजने त्या सगळ्याची व्यवस्था केली. या भटक्या कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याहून डॉ. विनय भगत यांचा पाचारण करण्यात आले. त्यांनी पॉजचे डॉ. प्रज्वल भारती, डॉ. प्रदीप शंगारे आणि रिघा परमेश्वरन ह्यांचा मदतीने सुमारे दोन तास शास्त्रकिया करून त्या भटक्या कुत्र्याचा जीव वाचविला. हा भटका कुत्रा आठ वर्षाचा असून खास पुण्याहुन गॅस अनास्थेशीया मागवून त्याच्यावर शास्त्रकिया करण्यात आली.