नियमबाह्य प्रवाशांकडून १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 05:53 PM2020-11-27T17:53:50+5:302020-11-27T17:55:35+5:30
Central Railway : लांबपल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली असून त्या व्यक्तींकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
डोंबिवली : अनधिकृत प्रवाशांचा रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागामार्फत उपनगरीय आणि विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाविरूद्ध नियमित, गहन आणि विशेष तिकीट तपासणी मोहीमेच्या माध्यमातून तिकिट तपासणी कर्मचार्यांच्या पथकाने जून ते २० नोव्हेंबर या आढळून आली.
त्याद्वारे दंड म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम रेल्वेने वसूल केली. त्यापैकी सर्वाधिक उपनगरी गाड्यांमध्ये ३९ हजार ५१६ प्रकरणे आढळून आली आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लांबपल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली असून त्या व्यक्तींकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
३६ हजार ७५४ प्रकरणे नियमित तिकिट तपासणी मोहीमेमध्ये, ४ हजार ६१६ प्रकरणे गहन तिकिट तपासणी मोहीमेमध्ये आणि २ हजार १४६ प्रकरणे विशेष तिकिट तपासणीच्या मोहीमेमध्ये आढळून आली आहेत. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे.