KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार

By मुरलीधर भवार | Published: April 27, 2023 07:07 PM2023-04-27T19:07:42+5:302023-04-27T19:08:06+5:30

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत राज्य सरकारकडून कल्याण डाेंबिवली महापालिकेस १० काेटी रुपयांचा पुरस्कार मिळाला.

10 crores of the award received by KDMC will be spent on the beautification of the city | KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार

KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार

googlenewsNext

कल्याण : शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत राज्य सरकारकडून कल्याण डाेंबिवली महापालिकेस १० काेटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ही १० काेटीची रक्कम शहर सौंदर्यीकरणासाठी वापरणार असल्याची माहिती आयु्क्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. महानगरपालिकेस‍ द्वितीय क्रमांकाचे १० कोटीचे पारितोषिक जाहिर झाले. याबाबत स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ज्या-ज्या संस्थानी महानगरपालिकेस मदत केली होती, त्यांच्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात काल आयोजिलेल्या कृतज्ञता सोहळ्या समयी आयुक्तांनी उपराेक्त माहिती दिली. 

आयु्क्तांनी सांगितले की, स्पर्धा झाली म्हणजे काम झाले नाही, ही तर सुरुवात आहे आता नविन सल्लागारांची नेमणूक करुन शहरासाठी  नवीन  संकल्पना राबविणार आहोत. नेतीवली टेकडीवरील घरे आकर्षकरित्या रंगविल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. त्यामुळे मनसे आमदार राजू  पाटील यांचे विशेष आभार आयुक्तांनी यावेळी मानले.  शहरात रस्ते दुभाजकांना रंगरंगोटी, इलेक्ट्रीक कप स्टोन, तलाव सुशोभिकरण, भिंतींवर सुंदर चित्रांचे रेखाटन, चौक, वाहतुक बेटे सुशोभिकरण, कारंजे आदीकरीता महापालिकेस सहकार्य केलेल्या, शहर सौंदर्यीकरणात योगदान दिल्याबाबत सर्व संस्थाचे, हॉस्पीटलचे आणि नागरीकांचे त्यांनी आभार मानले. कच-याची विल्हेवाट अधिक चांगल्याप्रकारे करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे जीव्हीव्ही पॉईंट् पूर्णपणे बंद करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट आहेत असे ही आयुक्तांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशनचे महापालिकेचे ब्रँन्ड अॅम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील यांनी यावेळी सामयोचित भाषण केले. "माझा श्वास - माझं कल्याण" हे ब्रीद वाक्य घेवून पुढे जाऊया असे असे डाॅ. पाटील यांनी सांगितले.  क्रेडाई एमसीएचआयचे साकेत तिवारी यांनी महापालिकेस उपक्रमांना आमचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या समयी शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसाठी महापालिकेस सहकार्य केलेल्या विविध संघटना, सामाजिक संस्था, रुग्णालये, एनजीओज, इंडियन मेडिकल असोसिएशन, क्रेडाई एमसीएचआय इ. संस्थांचा महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.‍ त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या शहरी कार्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या फ्रीडम टू वाॅक, सायकल अॅण्ड रन कॅम्पेन या देशपातळीवरील स्पर्धेत धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या सहा. अभियंता अजित देसाई यांचा तसेच चालण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविलेल्या प्रभारी उद्यान अधिक्षक अनिल तामोरे यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.‍

 तसेच राज्य सरकारने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे दाेन लाख रुपये रक्कमेचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनाही प्रशस्तीपत्र देवून महापालिका आयुक्तांच्या यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.‍ या समयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आदी मान्यवर उपस्थित हाेते.

 

 

Web Title: 10 crores of the award received by KDMC will be spent on the beautification of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.