केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:30 AM2020-12-26T00:30:31+5:302020-12-26T00:30:56+5:30
KDMC : मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने अभय योजनेतून मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १०३ कोटी ९१ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने येत्या चार दिवसांत त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा व त्यांची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन मनपाने केले आहे.
मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला. कोरोनाकाळात थकबाकीदारांकडून सक्तीची करवसुली करता आली नाही. मनपाने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली. आतापर्यंत या योजनेतून मनपाला १०३ कोटी ९१ लाख रुपये मिळाले आहेत.
अभय योजना लागू करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्रकारांनी विचारले होते की, यापूर्वीही मनपाने सरसकट अभय योजना लागू केली असता तिला अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यावर त्यांनी या योजनेतून १०० कोटी रुपये जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, योजनेची मुदत संपण्यापूर्वीच चार दिवस आधी मनपाच्या तिजोरीत १०३ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले आहेत. येत्या चार दिवसांत आणखीन काही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
मनपाला यापूर्वी जाहीर केलेल्या अभय योजनेतून एक हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तेव्हा ६५ कोटी जमा झाले होते. परंतु, यंदा १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. अभय योजनेचे १०३ कोटी ९१ लाख धरून मनपाने आतापर्यंत २४० कोटी रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे.
मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती
अभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय हा आयुक्तांवर अवलंबून असेल. मुदतवाढ न दिल्यास ३५० कोटींचे वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी वसुली विभागाच्या हाती आणखीन तीन महिने आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मालमत्ता करवसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी सांगितले.