सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर केडीएमसीच्या ताफ्यात, प्रदूषणाला बसणार आळा
By मुरलीधर भवार | Published: April 26, 2023 03:24 PM2023-04-26T15:24:09+5:302023-04-26T15:26:33+5:30
इंधनावरील खर्चात होणार बचत, KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर खरेदी केली असून हे डंपर महापालिकेच्या सेवेत आजपासून दाखल झाले आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इंधनावरील खर्चात बचत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सचिव संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने कचरा वाहतूकीसाठी वाहने खरेदी केली आहे. त्यापैकी सीएनजीवर चालणारे ११ डंपर महापालिकेने खरेदी केले आहेत. त्याचबरोबर १३ कचरा आरसी गाडय़ा, ४३ घंटा गाडय़ा, दोन धूर फवारणीच्या गाड्या आणि चार मॅकेनिकल स्वीपर खरेदी केले आहे. येत्या महिन्याभरात ही वाहने देखील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात रूजू होणार आहेत. ही वाहने देखील सीएनजी इंधनावर चालणारी आहेत.
महापालिकेस कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या इंधनावर वर्षाकाठी आठ कोटी रुपयांचा खर्च येत होता. सीएनजी इंधनावरील वाहन खरेदीमुळे वर्षाला चार कोटी रुपये महापालिकेचे वाचणार आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडून ओल्या कच:यापासून सीएनजी इंधन तयार करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. ओल्या कच:यापासून सीएनजी इंधन तयार झाल्यावर तेच इंधन या सीएनजी कचरा वाहनांकरीता वापरता येणार आहे. प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर महापालिकेचा सीएनजीवरील खर्चही देखील वाचणार आहे.