कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:48 AM2020-12-12T01:48:13+5:302020-12-12T01:48:45+5:30
KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या ठाणे कार्यालयाने महापालिकेस नोटीस बजावून थकीत असलेले ११० कोटी भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम कोरोनाकाळात तातडीने कुठून भरायची, असा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या सुधारित नियमानुसार नगर परिषदा व महापालिकांनी नेमलेल्या कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांची पीएफ रक्कम भरणे बंधनकारक आहे. राज्यात बहुसंख्य पालिकांतील कंत्राटदारांनी ही रक्कम भरलेली नाही. पालिकेस भविष्य निर्वाह निधी भरण्यासाठीचा खाते क्रमांक हा २०१४ मध्ये मिळाला. त्यात नियमित पीएफची रक्कम भरणे आवश्यक हाेते. संबंधित कंत्राटदाराने कामाचा तपशील ठेवून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरणे बंधनकारक आहे. कंत्राटदारास पालिकेने नेमल्याने प्रशासनाकडे तपशील मागितला होता. पालिकेकडे असा तपशील नसल्याने भविष्य निर्वाह निधी खात्याने २०११ ते २०१६ दरम्यानचा पालिकेच्या जमा-खर्चाचा तपशील घेतला. त्यानुसार पालिकेस कंत्राटी कामगारांच्या पीएफच्या थकीत रकमेपोटी ११० कोटींची नोटीस बजावली आहे. ही रक्कम कंत्राटदारांनी भरली नाही तर पालिकेस भरावी लागणार आहे.
काेराेनाला राेखण्यासाठी ९४ काेटी खर्च
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे ९४ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहेत. कोरोनामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडे महापालिकेने २१४ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोरोनाकाळात सक्तीने करवसुली करू नये, असे म्हटले आहे. या कोरोनाकाळात ही नोटीस आल्याने इतकी मोठी रक्कम कंत्राटदारांनी भरली नाही तर महापालिका तरी कुठून भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.