डोंबिवलीत पकडली ११० लीटर हातभट्टीची दारू; चारचाकी वाहनासह ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त
By प्रशांत माने | Published: May 14, 2024 08:07 PM2024-05-14T20:07:46+5:302024-05-14T20:08:02+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.
डोंबिवली : राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाने पुर्वेकडील मानपाडा, कल्याण-शीळ रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ कारमधून बेकायदेशीरपणे हातभट्टी गावठी दारूची वाहतूक करणा-याला मंगळवारी अटक केली. या कारवाईत कारसह व ११० लीटर गावठी दारू असा एकूण ६६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाने २९ आरोपींना अटक करीत दारूसह २३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी देखील त्यांनी चारचाकी वाहन आणि गावठी दारू असा ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंबिवली विभागाचे निरिक्षक किरणसिंग पाटील, प्रशांत निकाळजे, सागर धिडसे, रंजित आडे, एच एम देवकते, अमृता नगरकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली असून अभय सकपाळ (वय २२) रा. नवी मुंबई असे अटक आरोपीचे नाव आहे.