१२ जिहादी डोंबिवलीचे? शाळा, कॉलेजमध्ये स्फोटाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:41 AM2022-01-25T07:41:55+5:302022-01-25T07:43:04+5:30
शाळा, कॉलेजमध्ये स्फोटाची धमकी : तीन पथके तयार
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘स्कूल के साथ साथ मुंबई के रेल्वे स्टेशनोंपर भी धमाका होगा...’ असा मजकूर असलेला मेल ठाणे पोलिसांच्या शाळेला आला आहे. कुर्बानीसाठी ५० जिहादी तयार असून, त्यात डोंबिवलीतील १२ मराठी जिहादींच्या नावांची यादीच दिली आहे. त्याद्वारे लहान मुले आणि सामान्य माणसांचे जीवही जातील, असेही या धमकीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाच्या शोधासाठी ठाणेनगर पोलिसांची दोन तर सायबर गुन्हे शाखेचे एक अशी तीन पथके तयार केली आहेत.
ऐन प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस आधी ‘लष्कर’च्या नावाने हा धमकीचा मेल आल्याने ठाणे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक ठाणेनगर पोलिसांचीही दोन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. २१ जानेवारी २०२२ रोजी ठाणे पोलीस स्कूलच्या मेल आयडीवर लष्कर २२ नावाने हा मेल आला आहे. ही धमकी देणाऱ्याने स्वत:चे नाव जावेद खान असे सांगितले असून, आपण लष्कर २९चा प्रमुख असल्याचा दावाही केला आहे. हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो, इतकेच आपले लक्ष्य असून, त्यासाठी कुर्बानी आणि धमाका या दोन मार्गाचा अवलंब केल्याचे म्हटले आहे. ५० जिहादी यासाठी तयार आहेत. त्यात डोंबिवलीतील १२ मराठी जिहादींची नावेही टाकली आहेत. इथली शिक्षण व्यवस्था बंद करुन त्याऐवजी मदरसाद्वारे शिक्षण व्यवस्था सुरू झाली पाहिजे, यासाठी मुंबईतील शाळा, कॉलेज आणि काही रेल्वे स्थानकांवर धमाके केले जातील, अशी दर्पोक्तीही यातून दिली आहे.
जिहाद भारतातील घराघरात पोहोचविणे हेच मिशन २०२२ आहे. आपण दहशतवादी नसल्याचा दावा यात केला आहे. जिहादसाठी अनेक मुजाहिद (आत्मघात करणारे) आमच्याकडे कुर्बानीसाठी तयार आहेत. पोलिसांनी पकडावे, असे आव्हानही यात दिले आहे.
भाषा दहशतवाद्यांची, मात्र दिशाभूल करण्याचा प्रकार
पत्रातील भाषा जरी दहशतवाद्यांसारखी असली तरी हा दिशाभूल करण्याचाही प्रकार असण्याची शक्यताही एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. पत्राची सर्वच बाजूंनी चौकशी केली जात आहे. मात्र, ठोस कोणतीही माहिती अजूनही पुढे आलेली नसल्याचे ठाणेनगर पाेलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.