महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२० कोटींचे वीजबिल थकीत
By अनिकेत घमंडी | Published: February 27, 2024 07:37 PM2024-02-27T19:37:27+5:302024-02-27T19:37:41+5:30
चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज ग्राहकांकडे (उच्चदाब, कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून) १२० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या वीजबिल मागणतील जवळपास ९४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. त्यामुळे थकित वीजबिलाची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने मंगळवारी केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या फिल्डवर आहेत. कल्याण परिमंडलात मार्च २०२३ अखेर ७ हजार ८५१ ग्राहकांकडे ५४ कोटी आणि एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान २ लाख ५२ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी ३० लाख कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर फेब्रुवारी महिन्यात वीजबिल भरण्याची मुदत संपलेल्या ३ लाख ५२ हजार ग्राहकांकडे जवळपास ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ५२ हजार ३३६ ग्राहकांकडे ८ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत ९८ हजार ७२७ ग्राहकांकडे ४६ कोटी ६३ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील १ लाख ६ हजार ३२ ग्राहकांकडे २१ कोटी ८१ लाख तर पालघर मंडलातील १ लाख १२ हजार ९८८ ग्राहकांकडे ४२ कोटी ५४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडे २७३ कोटींची थकबाकी
याशिवाय कल्याण परिमंडलात थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले २ लाख ८५ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे तब्बल २७३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसई मंडल कार्यालयांतर्गत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले सर्वाधिक ९९ हजार असून त्यांच्याकडे १०१ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे.