कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत १२५ ढोल ४० ताशांच्या वादनातून अनोखी मानवंदना!
By प्रशांत माने | Published: April 3, 2024 05:40 PM2024-04-03T17:40:19+5:302024-04-03T17:40:45+5:30
अनोख्या मानवंदनेसाठी शहरातील संस्कृती, शिवदुर्ग, वेदमंत्र आणि पांचजन्य अशी चार ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: गुढीपाडव्याला निघणा-या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यंदा शहरामधील प्रमुख ढोल ताशा पथकांकडून या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ९ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे एकत्रितरित्या १२५ ढोल आणि ४० ताशांचे एकत्रित वादन करून अनोखी मानवंदना दिली जाणार आहे.
यंदाची नववर्ष स्वागत यात्रा यापूर्वीच्या स्वागत यात्रेपेक्षा अधिक भव्य आणि सर्वसमावेशक करण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच आणि सर्वच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अनोख्या मानवंदनेसाठी शहरातील संस्कृती, शिवदुर्ग, वेदमंत्र आणि पांचजन्य अशी चार ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत. या चार पथकांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी फडके मैदान येथे एकत्रितरित्या १२५ ढोल आणि ४० ताशांचे वादन केले जाणार आहे. सारंग केळकर आणि अॅड जयदीप हजारे यांनी पुढाकार घेत या मानवंदनेचे आयोजन केल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक डॉ प्रशांत पाटील यांनी दिली.