MIDC मिलापनगरच्या काही भागात १३ तास बत्ती गुल; रहिवासी उकाड्याने हैराण
By अनिकेत घमंडी | Published: April 5, 2024 06:48 PM2024-04-05T18:48:25+5:302024-04-05T18:48:57+5:30
नवीन काँक्रीटीकरण रस्ते बनवितांना रस्त्यांचा मध्ये आलेल्या महावितरणच्या केबल या रस्त्यांचा कडेला घेण्यात न आल्याने हा मोठा फटाका नागरिकांना आणि महावितरण यांना बसला आहे
डोंबिवली : एमआयडीसी मधील मिलापनगर बंगलो रस्ता क्रमांक ३ आणि १६परिसरातील काल रात्री अचानक वीज पुरवठा बंद झाल्याने रात्रभर उकाड्यात रहिवाशांना रहावे लागले. शुक्रवारी दुपारी एक वाजता तात्पुरता दुसऱ्या फिडर वरून वीज पुरवठा चालू करण्यात आला आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेन्द्र धवड आणि त्यांच्या टीमने येऊन सकाळी पाहणी केली असता कुठे तरी केबल ब्रेक झाल्याचे समजल्याने महावितरणने मशिन द्वारे तपासले असता एका ठिकाणी काँक्रिट रस्त्याचा खाली केबल नादुरुस्त झाल्याचे निष्पन्न झाले असून नवीन काँक्रिट रस्ता तोडणे शक्य नसल्याने आता रस्त्याचा कडेने नवीन केबल महावितरण कडून टाकण्यात येणार आहे. तोपर्यंत तात्पुरते वीज पुरवठा चालू केला तरी त्यावरून लोड घेईल असे घरातील उपकरणे ( वातानुकूलित यंत्रे AC इत्यादी ) चालू करू नये असे आवाहन महावितरण अभियंत्यांनी केले आहे.
नवीन काँक्रीटीकरण रस्ते बनवितांना रस्त्यांचा मध्ये आलेल्या महावितरणच्या केबल या रस्त्यांचा कडेला घेण्यात न आल्याने हा मोठा फटाका नागरिकांना आणि महावितरण यांना बसला आहे. एमएमआरडीए कडून रस्ते काँक्रीटीकरण करण्यापूर्वी केबल रस्त्यांचा कडेला घेण्यासंदर्भात सांगण्यात आले नसल्याने हा त्रास सर्वांना होत असल्याचे तेथे पाहणी करण्यास आलेले महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे. काँक्रिट रस्ते बनवितांना केबलला धक्का लागल्याने रस्त्याखालील अनेक केबल अर्धवट नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा केबलमुळे यापुढे वीज जाण्याचे प्रकार वाढणार आहेत. येत्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हा त्रास विशेष जाणवणार असल्याचे दक्ष रहिवासी राजू नलावडे म्हणाले.