मृतांच्या कुटुंबाला १३ लाख; नोकरीसह शैक्षणिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:58 AM2023-09-28T06:58:58+5:302023-09-28T06:59:21+5:30
स्फोटानंतर सेंच्युरी कंपनीकडून भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : सेंच्युरी कंपनीतील टँकर स्फोटात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबांना १३ लाख आर्थिक मदत, एका वारसदाराला कायम नोकरी व हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. तसेच दहावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.१, शहाड गावठाण येथील सेंच्युरी कंपनीत शनिवारी स्फोट होऊन टँकर चालक पवन यादव यांच्यासह कंपनीचे कामगार शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव व अनंता डोंगोरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा कामगार जखमी झाले. कंपनीवर गुन्हा दाखल झाला. मृत कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला १३ लाखांची मदत, एका वारसदाराला कायम नोकरी व मुलांच्या इयत्ता १० पर्यंत शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार आहे.
मिळणार हक्काचे घर
कंपनी प्रशासनासोबत कामगार संघटनेने चर्चा केल्यानंतर मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती ललका यांनी दिली.
सेंच्युरी रेयॉन कंपनीत ३५०० कायम कामगार, २५०० कंत्राटी कामगार व ५०० कर्मचारी व अधिकारी असे एकूण सहा हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत.
कामगारांच्या सुरक्षेला कंपनीने प्राधान्य दिल्याचे ललका म्हणाले.
गेटवर ठिय्या आंदोलन
कंपनीत स्फोट झाला त्यावेळी सहा हजार कामगारांच्या कंपनीत कामगार संघटना व त्यांचे नेते, पदाधिकारी कुठेच दिसले नाहीत.
जनशक्तीचे शैलेश तिवारी यांनी संध्याकाळी काही कार्यकर्ते व कामगाराच्या कुटुंबासोबत कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी केल्यावर, कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले होते.