138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू
By पंकज पाटील | Published: October 10, 2023 03:18 PM2023-10-10T15:18:03+5:302023-10-10T15:20:50+5:30
१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली
अंबरनाथ: अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम आता मंजूर झाले असून या कामाला येता काही दिवसातच सुरुवात करण्यात येणार आहे. 138 कोटीच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण शिव मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून अवघ्या एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या सर्व मंजुरीचा अडथळा पार करत अंबरनाथ पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या सुशोभीकरणाचे १०७ कोटींचे काम आता सुरू होत आहे. याकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा. ली. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्मारक पुरातत्व विभागाच्या अटी आणि शर्तीचे पालन करुन हा परिसर भाविकांसाठी एक चांगले पर्यटन क्षेत्र बनवण्यात येणार आहे. या कामाच्या उभारणीनंतर शिव मंदिर परिसराला नवी झळाळी प्राप्त होणार असून केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर एक धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून जगभरात परिचित होणार आहे.
सुशोभीकरनासाठी काळा दगडांचा वापर :
प्राचीन शिव मंदिर हे पुरातन असल्यामुळे या मंदिराचे सुशोभीकरण करत असताना काळापासून यचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. मंदिराचा पुरातत्त्व महत्त्व कायम ठेवण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
कामातील वैशिष्ट्य :
या सुशोभीकरणाच्या प्रस्तावात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर , संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, चेक डॅम , भक्त निवास , वालधुनी नदीवर घाट आणि संरक्षक भिंत यांसारखी कामे या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे.