14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 02:20 AM2020-12-23T02:20:31+5:302020-12-23T02:21:00+5:30
Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली.
कल्याण : नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांना पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे अथवा त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केली आहे. या मागणीकरिताच समितीने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ही गावे २००७ साली महापालिकेतून वगळण्यात आली. २००९ पासून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. या गावात रस्ते विकास झालेला नाही. पाण्याची तीव्र समस्या आहे. २०१५ साली २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, तेव्हा नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे ठाणे, कल्याण-डोंबिवली अथवा नवी मुंबई महापालिकेस जोडण्याबाबत काही निर्णय घेतला गेला नाही. राज्य सरकारने १४ गावांची नगरपंचायत करण्याचे घोषित केले होते. मात्र, या १४ गावांना नगरपंचायत नको आहे. त्यांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट व्हायचे आहे. या मागणीसाठी ग्रामपंयाचत निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
मनसे, राष्ट्रवादीचा पाठिंबा
जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. या गावातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढविणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले. १४ गावांच्या बहिष्काराला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला. मनसेच्या पाठिंब्यानंतर राष्ट्रवादीनेही बहिष्काराला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन वालिलकर यांनी जाहीर केले आहे.
१४ गावे काेणती?
दहिसर, दहिसर मोरी, मोकाशीपाडा, पिंपरी, भंडार्ली, गोठेघर, उत्तरशीव, नारीवली, बाळे, वाळकण, बामल्ली, निघू, नेवाळी, नागाव.