'ती' 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जाणार; पालकमंत्र्यांचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:27 AM2022-03-25T01:27:22+5:302022-03-25T01:29:09+5:30
ही 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेली 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
विधानसभेचे अधिवेशन आटोपून आमदार पाटील हे त्यांच्या पलावा येथील कार्यालयात परतले. तेव्हा त्याठिकाणी 14 गावे सर्व पक्षी संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. पाटील यांचे आगमन होताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह पालकमंत्र्यांचे आभार मानले. आमदार पाटील यांनी सांगितले की, कोविडमुळे अधिवेशन होत नव्हते. काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आज 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची लक्षवेधी मांडली. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातील, असा दुजोरा पालकमंत्री शिंदे यांनी दिला आहे. हा लढा त्याठिकाणच्या संघर्ष समितीचा आहे. याचे सर्व श्रेय त्या गावातील एकजूटीला देत असल्याचे मान्य करीत आमदार पाटील यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले आहेत.
यावेळी संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, आमच्या 14 गावांत पाच ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीमुळे पाहिजे तसा गावांचा विकास होत नव्हता. गेल्या तीन निवडणूकांवर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमची गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी आमची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी उचलून धरली. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पालकमंत्री शिंदे यांनी गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येतील असे मान्य केले आहे.