१६०० कुत्रे, मांजरीना रेबीज लस; रॅलीला प्राणीमित्र, नागरिकांचा सहभाग
By अनिकेत घमंडी | Published: September 30, 2023 06:13 PM2023-09-30T18:13:37+5:302023-09-30T18:13:52+5:30
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा उपक्रम
अनिकेत घमंडी, डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षी रेबीज दिनानिमित्त एक आठवड्याचा भटक्या श्र्वानांसाठी रेबीज लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ०९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत १६००हून अधिक भटके कुत्रे व भटक्या मांजरींना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. शनिवारी गणेश मंदिर डोंबिवली येथून एक रॅली काढण्यात आली.
त्या रॅलीमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन युथचे सदस्य, प्रकाश विद्यालय, महात्मा गांधी विद्यामंदिर, न्यू केंब्रिज स्कूल, प्रगती कॉलेज, रॉयल कॉलेज व एम के एम पटेल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच अनेक श्वानप्रेमी, प्राणी प्रेमी, व्हिपीडब्ल्यूए चे सदस्य व रोटरी सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते.
रॅली नंतर एका चर्चासत्राचे आयोजन गणेश मंदिर हॉल येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रास रोटरी डिस्ट्रिक्ट चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मनोज पाटील व असिस्टंट गव्हर्नर शैलेश गुप्ते हे प्रमुख अतिथी व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर अकोले व अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर यांची भाषणे झाली. या चर्चासत्रात बोलताना रो. मनोज पाटील व रो. शैलेश गुप्ते यांनी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ मकरंद गणपुले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.