डोंबिवलीतील मोठा गाव रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाकरीता १६८ कोटीचा निधी मंजूर
By मुरलीधर भवार | Published: June 2, 2023 01:43 PM2023-06-02T13:43:40+5:302023-06-02T13:44:25+5:30
मोठा गाव ते माणकोली या खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून ८० टक्के पेक्षा जास्त पूलाचे काम मार्गी लागले आहे.
डोंबिवली-शहराच्या पश्चिम भागातील मोठा गाव येथे दिवा वसई रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाण पूलाच्या कामाकरीता राज्य सरकारने १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोठा गाव ते माणकोली या खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून ८० टक्के पेक्षा जास्त पूलाचे काम मार्गी लागले आहे. हा खाडी पूल लवकर वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याचबरोबर मोठा गाव ते कल्याण दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पाचा तिसरा टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे. मात्र रिंग रोड आणि मोठा गाव माणकोली खाडी पूलाकडे जाण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतून मोठा गावात जाण्यासाठी मोठा गाव येथे रेल्वे फाटक लागते. हे रेल्वे फाटक दिवा वसई रेल्वे मार्गावर आहे. याठिकाणी रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या पूलाच्या कामाकरीता रेल्वे आणि महापालिका प्रत्येकी ५० टक्के रक्कम भरावी लागते.
या पूलाच्या कामाकरीता महापालिकेच्या हिश्याची रक्कम ३० कोटी रुपये होती. तसेच पूलाच्या कामात बाधितांचे पुनर्वसन करण्याकरीता १३८ कोटी रुपयांची आवश्यकता होती. पूलाचे बांधकामाकरीता लागणारी महापालिकेच्या हिश्याची ३० कोटी रुपयांची रक्कम आणि बाधितांच्या पुनर्वसनाची रक्कम १३८ कोटी रुपयांची रक्कम ही महापालिकेस भरणे शक्य नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. महापालिका क्षेत्रात मूलभूत साेयी सुविधा पुरविणे या निधीतून १६८ कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाल्याने मोठा गाव रेल्वे उड्डाणपूलाचे कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेवरील आर्थिक भार कमी होऊन या पूलाचे काम होणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळणार आहे.