कल्याण पश्चिमेत औद्योगिक ग्राहकाकडून १७ लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

By अनिकेत घमंडी | Published: October 19, 2022 02:41 PM2022-10-19T14:41:59+5:302022-10-19T14:43:53+5:30

४ लाख ८० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

17 lakhs power theft from an industrial customer in kalyan west filed a case | कल्याण पश्चिमेत औद्योगिक ग्राहकाकडून १७ लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

कल्याण पश्चिमेत औद्योगिक ग्राहकाकडून १७ लाखांची वीजचोरी; गुन्हा दाखल

Next

कल्याण: येथील पश्चिम विभागात ॲल्युमिनियम फ्रेम कोटींग अनोडायझिंग करणाऱ्या औद्योगिक ग्राहकाकडील १७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा महावितरणच्या पथकाने पर्दाफाश केला हा. ग्राहक गेल्या वर्षभरापासून न्युट्रल नियंत्रणाद्वारे मीटरचा डिस्प्ले बंद करुन वीजचोरी करत असल्याचे उघडकीस आले असून त्याला ४ लाख ८० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम न भरल्याने या औद्योगिक ग्राहकासह वीज वापरकर्त्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जुमीन निजामुद्दीन जलाल (औद्योगिक ग्राहक) आणि मोहम्मद फैजल फारुकी (वापरकर्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महावितरणच्या भरारी पथक व स्थानिक अधिकाऱ्याच्या चमुने कल्याण पश्चिमेतील खाडी किनारा, रेतीबंदर येथील मोहमदिया इंग्लिश शाळेसमोरील अनोडायझिंग कारखान्याच्या मीटरची पहाटेच्या सुमारास तपासणी केली. सबंधित ग्राहक मीटरमध्ये फेरफार करत न्युट्रल नियंत्रित करून विजेचा चोरटा वापर करत असल्याचे तपासणीत आढळून आले. वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून रात्रीच्या वेळी हा ग्राहक मीटरचा डिस्प्ले बंद करून वीजचोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. 

सहजपणे लक्षात येणार नाही अशा रितीने त्याने वीज चोरीसाठीची यंत्रणा उभारली होती. या ग्राहकाने ऑक्टोबर २०२१ पासून १७ लाख ८ हजार रुपये किंमतीची ९५ हजार २२९ युनिट वीज चोरुन वापरल्याचे आढळून आले. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध वीज कायदा प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक लक्ष्मण गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

कल्याण पश्चिम उपविभाग दोनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता माणिक गवळी, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक जनार्दन जाधव यांच्या सहकार्याने भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते, सहायक अभियंता अतुल ओहोळ, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी राकेश कुथे, वरिष्ठ तंत्रज्ञ अरुणा नागरे, प्रदीप फराड, विद्युत सहायक प्रफुल्ल राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 17 lakhs power theft from an industrial customer in kalyan west filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण