छापा काटा स्पर्धेमध्ये तंत्रज्ञान माणसाशी जवळीक/दुरावाला प्रथम क्रमांक
By अनिकेत घमंडी | Published: March 18, 2024 07:14 PM2024-03-18T19:14:06+5:302024-03-18T19:15:39+5:30
'आजची तरुणाई भिरभिरती की ध्येयाकडे जाणारी'ला द्वितीय क्रमांक
डोंबिवली: छापा-काटा' ही एकाच विचाराच्या दोन बाजू सांगणे, अशा अनोख्या स्पर्धेत पंधरा जोड्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यानिमित्ताने 'मराठी सणांचे महात्म्य' यामध्ये अर्थातच बारा समूहानी भाग घेतला. त्या स्पर्धेमध्ये,' तंत्रज्ञान माणसाशी जवळीक/ दुरावा' या विषयाला प्रथम क्रमांक राजश्री भिसे आणि सुजाता मराठे यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक उज्ज्वला लुकतुके आणि वैशाली जोशी 'आजची तरुणाई भिरभिरती की ध्येयाकडे जाणारी' या विषयाला मिळाला. तृतीय क्रमांक 'उत्सवामध्ये राजकारण्यांची मदत हवी की नको' या विषयावर बोलणाऱ्या अनुराधा आपटे आणि अर्चना सरनाईक यांना मिळाला. निमित्त होते ते आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या डोंबिवली शाखेने आयोजित केलेला जागतिक महिला दिन उपक्रमाचे. सी. के. पी. हॉल, डोंबिवली पूर्व येथे तो कार्यक्रम संपन्न झाला. तसेच रेखा गोखले यांनी 'खट्याळ सासू नाठाळ सून' या दोन्ही बाजू मांडून बक्षीस मिळवले.
दुपारच्या सत्रात 'सणांचे महात्म्य' विषयावरील कार्यक्रमात पहिले दोनही नंबर ठाण्याच्या महिलांनी पटकावले. त्यामध्ये स्वतः पद्मा हुशिंग, अलका दुर्गे, अस्मिता चौधरी, किरण बर्डे, ज्योती गोसावी, संपदा दळवी, अलका वढावकर वगैरे बऱ्याच जणींचा समावेश होता. तर तिसरा चौथा नंबर आश्विनी मुजुमदार, अमिता चक्रदेव, उज्वला लुकतुके यांच्या चमूने पटकावला. परीक्षक म्हणून डॉ. ललिता नामजोशी, शीतल दिवेकर, अंजली खिस्ती डॉ. धनश्री साने आणि प्रा. मेधाताई सोमण यांनी काम केले. शुभदा कुलकर्णी यांनी आकर्षक आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तर स्पर्धांसाठी आदिती जोशी आणि वैशाली जोशी यांनी शैलीदार निवेदन केले. संस्थेच्या अध्यक्षा पद्मा हुशिंग, सचिव वृषाली राजे, विश्वस्त विजया पंडितराव आणि डोंबिवली शाखा प्रमुख अनुराधा फाटक यांच्या हस्ते, दीपप्रज्वलन आणि अपर्णा पेंडसे यांच्या कत्थक नृत्याने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखिका माधवी घारपुरे आणि भारती मेहता उपस्थित होत्या. प्राची गडकरी यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रतिभा दाबके कोषाध्यक्ष यांनी आभार मानले