'त्याच्या' नावे जागा नसताना २ कोटी ८ लाखांचा मोबदला अन्य व्यक्तीच्या नावे वाटप
By मुरलीधर भवार | Published: December 27, 2022 06:15 PM2022-12-27T18:15:15+5:302022-12-27T18:15:46+5:30
मिठाईवाला हे बल्याणी येथे २०११ सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे.
कल्याण - कल्याणनजीक बल्याणी गावात राहणारा मोहम्मद शाहीद मिठाईवाला या व्यक्तिची जागा मुंबई वडोदरा महामार्गाच्या प्रकल्पात बाधित होत नसताना त्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीला २ कोटी ८ लाख रुपये मोबदल्याची रक्कम वाटप करण्यात आली असल्याची तक्रार मिठाईवाला यांनी कल्याण प्रांत कार्यालयाकडे केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिठाईवाला यांनी केली आहे.
मिठाईवाला हे बल्याणी येथे २०११ सालापासून राहतात. त्यांची दुसऱ्या ठिकाणी जागा आहे. मात्र ज्या ठिकाणी त्यांचा नावावर जागा नाही. चाळ नाही. मात्र ती जागा मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्पात बाधित होत असल्याने त्यांच्या नावाने २ कोटी ८ लाख रुपये जमीनाचा मोबदला दुस:याच व्यक्तीला देण्यात आला आहे. हा निवडा वर्षभरापूर्वी झाला आहे. मात्र मिठाईवाला यांनी कामानिमित्त कल्याण प्रांत कार्यालयास भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या नावे जागा नसताना त्यांची नावाचा आणि फोटाचा वापर करुन प्रांत कार्यालयात संमती पत्र देत निवाडा करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने अन्य दुस:याच व्यक्तीने मोबदला लाटला आहे. हा निवडा त्यांच्या नावाचा गैरवापर करुन करण्यात आला आहे. त्यामुळे हा निवाडा रद्द करण्यात यावा. त्याच्या नावाने दिलेली २ कोटी ८ लाख रुपयांची रक्कम सरकार दफ्तरी जमा करण्यात यावी अशी मागणी मिठाईवाले यांनी त्यांचे वकील निलेश जाधव यांच्या माध्यमातून प्रांत कार्यालयाकडे केली आहे. या प्रकरणात लेखा परिक्षण झाल्यास जागा नसताना मिठाईवाले यांच्या नावे ही रक्कम घेतल्याचे दिसून येईल ही बाब वकिल जाधव यांनी अधोरेखीत केली आहे. या प्रकरणी प्रांत कार्यालयाकडून सुनावणी घेतली जाणार आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी मिठाईवाला यांचा तक्रार अर्ज कार्यालयास प्राप्त झाला आहे. प्रथम दर्शनी मिठाईवाला यांच्याच सह्या असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची शहानिशा केली जाईल. तसेच या प्रकरणात सुनावणी घेतली जाईल. काही अयोग्य आढळून आल्यास त्यांच्या मागणीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.