रेल्वे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ साेशल मीडियावर टाकून नोकरीचे आमिष दाखवित २१ लाखांना गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:38 AM2022-11-09T07:38:32+5:302022-11-09T07:38:50+5:30
मेल, एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वेत नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असे आवाहन केले होते.
कल्याण :
मेल, एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वेत नोकरी हवी असल्यास संपर्क साधा, असे आवाहन केले होते. त्याला भुलून एकाने त्याच्या पत्नीला नोकरी लावण्यासाठी २१ लाख रुपये दिले. मात्र, नोकरी न देता फसवणूक करणारा भामटा उमाशंकर बर्मा (रा. मूळ उत्तर प्रदेश) याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्वेत राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची आवश्यकता होती. सोशल मीडियाद्वारे जैन हे बर्मा याच्या संपर्कात आले. बर्मा याचा व्हिडीओ जैन यांनी पाहिला होता. त्याला प्रतिसाद देत जैन यांनी त्यांच्या पत्नीला नोकरी देण्यासाठी बर्मा याला २१ लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे देऊनही पत्नीला नोकरी न मिळाल्याने जैन यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्याला बर्मा प्रतिसाद देत नव्हता.
अखेरीस जैन यांनी बर्माला नांदिवली येथील घरी बोलावून घेतले. तसेच तो येणार असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यास दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी पोलीस अधिकारी हरिदास बोचरे आणि सुरेंद्र गवळी यांच्यावर कारवाईची जबाबदारी सोपविली. बर्मा हा जैन यांच्या घरी येताच पोलिसांनी त्याला अटक केली. बर्मा याला साथ देणारे आणखी दोन भामटे असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
व्हिडीओ बनवला कसा?
१. बर्मा हा मोटारमन अथवा लोको पायलट नाही. मग त्याने मेल एक्स्प्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ कसा बनविला? त्याला हा व्हिडीओ काढण्याची अनुमती रेल्वेच्या कोणत्या व्यक्तीने दिली?
२. पोलिसांसमोर जैन हे फिर्यादी म्हणून पुढे आले असले तरी बर्मा याने अशा प्रकारे अन्य किती जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.