पर्यावरण दक्षता मंडळाच्या २७ बागप्रेमींच्या २१० झाडांची डोंबिवलीत कल्पक मांडणी, प्रदर्शन
By अनिकेत घमंडी | Published: June 14, 2024 12:18 PM2024-06-14T12:18:38+5:302024-06-14T12:19:20+5:30
पर्यावरणप्रेमी नागरिकांचा चांगला प्रतिसाद
अनिकेत घमंडी, डोंबिवली: महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बालभवन, डोंबिवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "निसर्गोत्सव 2024" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या २७ बागप्रेमींच्या २१० झाडांची कल्पक मांडणी करून प्रदर्शन भरवण्यात आले होते.
डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या ग्रीन लवर्स क्लबच्या सभासदांच्या आणि स्वयंसेवकांच्या कुंडीतील झाडांचे प्रदर्शन, पर्यावरणपूरक उत्पादनाचे स्टॉल, बागकाम कार्यशाळा, ट्रे लँडस्केप स्पर्धा, तसेच सापांविषयी जनजागृती सत्र असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महानगरपालिकेच्या आयुक्त मा. डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते "निसर्गोत्सव 2024" चे उद्घाटन व बाग प्रेमींचा कौतुक समारंभ पार पडला. “निसर्गोत्सव 2024” च्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुपारी ट्रे लँडस्केप स्पर्धा घेण्यात आली ज्यात कल्याण व डोंबिवलीतील १० बागप्रेमींनी आपल्या कल्पकतेने सुंदर व वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित ट्रे लँडस्केप तयार केले. सायंकाळी दुसऱ्या सत्रात कुंडीतील फुलझाडे या विषयावर मीनल मांजरेकर यांनी कार्यशाळा घेतली.
“निसर्गोत्सव 2024” च्या पहिल्या सत्रात दुपारी सेवा संस्था डोंबिवली च्या कार्यकर्त्यांनी सापांविषयी माहिती आणि प्रथमोपचार यावर मार्गदर्शन सत्र घेतले. दुसऱ्या सत्रात डॉ. श्रेया भानप यांनी "वृक्षारोपण: कला आणि शास्त्र" या विषयावर कार्यशाळा घेतली. त्यानंतर सायंकाळी महेश देशपांडे यांच्या हस्ते ट्रे लँडस्केप स्पर्धेच्या विजेत्यांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले व ग्रीन लवर्सचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. निसर्गोत्सव 2024 च्या समारोपाच्या वेळी आर के बझार तर्फे सर्व सहभागींना 'निर्मल्यप्रभा' हे निर्माल्य खत मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
कुंडीतील झाडांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. बालभवन डोंबिवली येथे झाडांचे प्रदर्शन, बागकाम कार्यशाळा, स्पर्धा आणि जनजागृती उपक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या पूर्वतयारी पासून ते समारोपापर्यंत सर्व उत्साही ग्रीन मेंबर्स यात सहभागी होते. डॉ. अंजली रत्नाकर, मिनल मांजरेकर आणि डॉ. श्रेया भानप यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा आणि कार्यशाळांचे आयोजन झाले. पर्यावरण दक्षता मंडळाचे समन्वयक रूपाली शाईवाले, आदित्य कदम आणि समीक्षा चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केल्याचे महापालिका जनसंपर्क विभागाने सांगितले.