उल्हासनगरातील कल्याण ते बदलापूर महामार्ग रस्त्यासाठी २२ कोटी
By सदानंद नाईक | Published: July 18, 2023 03:43 PM2023-07-18T15:43:47+5:302023-07-18T15:52:05+5:30
उल्हासनगर पश्चिम मधून कल्याण ते।बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे.
उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी २२ कोटीच्या निधीला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. रस्त्याचे रुंदीकरण ९५ टक्के झाले असून काही दुकानदार न्यायालयात गेल्याने, रस्त्याचे काम रखडल्याचे आरोप होत आहे.
उल्हासनगर पश्चिम मधून कल्याण ते।बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. त्यातील फॉरवर्ड चौक ते साईबाबा मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार दरम्यान रस्त्याचे काम करण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी विशेष निधीची मागणी शासनाकडे लावून धरली होती. अखेर शासनाने पुरवणी मागणित २२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली. रस्त्याच्या अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी आमदार आयलानी हे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्या सोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आयलानी म्हणाले. रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदीचे आभार व्यक्त केले.
शहरातील मुख्य ७ रस्त्यासाठी एमएमआरडीएने तब्बल १५६ कोटीचा निधी महापालिकेला दिला असून मूलभूत सुखसुविधेच्या कामासाठी ४६ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. मात्र ४६ कोटीच्या निधीतून लहान रस्ते व गटारीच्या कामाला सुरवात झाल्याचे, महापालिका बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. मात्र या निधीतील कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून महापालिका बांधकामे विभागाने ४६ कोटीच्या निधीतील कामे प्रसिद्ध करावे. या मागणीने उचल खालली आहे. कामा विनाच या निधीतून बिले देत असल्याची ओरड होत आहे. या कामाची चौकशी झाल्यास मोठे मासे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.