चोरी गेलेला ३ कोटी १६ लाखांचा ऐवज पोलिसांनी नागरिकांना केला परत
By मुरलीधर भवार | Published: January 2, 2024 07:51 PM2024-01-02T19:51:55+5:302024-01-02T19:52:09+5:30
मुद्देमाल मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहावयास मिळाला.
कल्याण- कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत चोरीस गेलेला ३ कोटी १६ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ठाणे पोलीस आयुक्त आशूतोष डुंबरे यांच्या उपस्थित आज कल्याणमध्ये परत करण्यात आला. यावेळी ज्या नागरीकांना हा मुद्देमाल परत केला गेला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानसह आनंद पाहावयास मिळाला. अनेकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानत पोलिसाना आशीर्वाद दिले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नंदन सभागृहात पोलिस दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी ठामे पोलीस आयुक्त डुंबरे यांच्यासह सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि सुनिल कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उापयुक्त गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहाय्क पोलिस आयुक्त घेटे यानी केले. रोख रक्कमेच्या स्वरुपातील २७ लाख ८० हजार रुपये, सोन्या चांदीच्या स्वरुपातील १ कोटी १५ लाख ४० हजार रुपये, चोरीस गेलेली ५१ वाहने त्याची किंमत १ कोटी ४ लाख ५२ रुपये, चोरीस गेलेले ३५१ मोबाईल त्याची किंमत ४३ लाख ५६ हजार रुपये आणि इतर २५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलीस आयुक्तांच्या उपस्थित परत करण्यात आला. ज्यांना मुद्देमाल परत मिळाला त्यांनी पोलिस खूप चांगल्या प्रकारे काम करीत असून त्यांच्याकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत त्यांना आशीर्वाद दिले. मुद्देमाल मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहावयास मिळाला.