कल्याणच्या ३ धावपटूंनी पार केली जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन
By मुरलीधर भवार | Published: June 13, 2023 06:11 PM2023-06-13T18:11:01+5:302023-06-13T18:13:48+5:30
संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहदादपुरी अशी या धावपटूंची नावे आहेत.
कल्याण- जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत अवघड समजली जाणारी मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन. धावपटुंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी ही मॅरेथॉन कल्याणातील धावपटूंनी यशस्वीरित्या पूर्ण करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहदादपुरी अशी या धावपटूंची नावे आहेत. ही मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून त्यांचा कसून सराव सुरू होता. सुप्रसिद्ध धावपटू आणि प्रशिक्षक सतीश गूजराण यांना या तिघांना मार्गदर्शन केले होेते. आपल्याकडील मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन, पुणे मॅरेथॉन अशा स्पर्धा बघितल्या आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनशी आव्हानात्मक असते. यात सहभागी होणाऱ्या धावपटूंनी ४२ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ४ तास आणि ५० मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण केली असेल तरच त्यांना या मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो. या
मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंनी आपल्याकडील मॅरेथॉनच्या दुपटीहून अधिक म्हणजेच तब्बल ९० किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. तेही १२ तासांच्या आतमध्ये आणि कुठेही न थांबता. तर २१ किलोमीटर, ४२ किमी आणि ६५ किमीचे अंतर हे आयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच पार करण्याचे बंधन धावपटूंवर असते. ही मॅरेथॉन म्हणजे धावपटूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी असते. इतकी कठीणप्राय मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहदादपुरी या तिघांनी ही कठीण मॅरेथॉन पूर्ण करत कल्याणचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच केडीएमसीचे सचिव संजय जाधव, सायकलपटू आणि केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही या तिघा धावपटूंचे विशेष कौतुक केले आहे.