कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात
By मुरलीधर भवार | Published: December 19, 2022 05:32 PM2022-12-19T17:32:31+5:302022-12-19T17:34:05+5:30
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
कल्याण- कल्याणडोंबिवलीतील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना रविवारी प्रत्यक्ष सुरूवात झाली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली शहरातील रस्ते कामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३६० कोटी रुपयांचा निधी खासदार शिंदे यांनी मंजूर करुन आणला आहे. या निधीपैकी कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व परिसरातील ११० कोटी ६० लाख रुपये खर्चातून होणाऱ्या ११ विविध रस्त्यांच्या कामांना रविवारी सुरूवात झाली.
या प्रसंगी आमदार राजू पाटील, गणपत गायकवाड, पदाधिकारी राजेश कदम, राजेश माेरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, माधूरी काळे, प्रशांत काळे, विशाल पावशे आदी उपस्थित होते.
या रस्त्यांचे हाेणार आहे काॅन्क्रीटीकरण -
उंबार्ली पाईपलाईन ते उंबार्ली स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता नूतनीकरण, मानपाडा शिवमंदिर ते संदप उसरघर स्त्याचे काँक्रीटीकरण, क्रिस्टल प्लाझा ते गोदावरी बिल्डिंग रस्ता (कल्याण ईस्ट लोकग्राम), १०० फुटी रस्ता ते तिसाई मंदिर रास्ता , विजयनगर नाका ते आमराई (धर्मवीर आनंद फिघे साहेब चौक), नूतन विद्यामंदिर शाळा ते नाना पावशे चौक, शिवाजी कॉलोनी ते जुनी जनता बँक, कल्याण पूर्व चिंचपाडा कमान ते डी. एम.एम. शाळेपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण, काटेमनावली नाका - हनुमान नगर - हरिभाऊ पाडा - साईबाबा नगर - कैलास नगर - म्हसोबा चौक - खडेगोलवली पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, विठ्ठलवाडी स्टेशन ते सूर्या शाळेपर्यंत च्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदीश दूध डेअरीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.
खाेणी ते काटई नाका दरम्यानची एक मार्गिका खुली -
खाणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून या मार्गासाठी २० कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. यातील एक मार्गिका यापूर्वीच प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे.