कल्याणमध्ये रविवारी बामसेफचे 36वे राज्य अधिवेशन; ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी
By मुरलीधर भवार | Published: August 26, 2022 09:11 PM2022-08-26T21:11:25+5:302022-08-26T21:13:55+5:30
केंद्र सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणार आहे.
कल्याण येथे बामसेफचे 36वे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी (28 ऑगस्ट) आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात तीन महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. ओबीसीची जातिनिहाय जनगणना करण्याचा महत्वाचा विषय या अधिवेशनात चर्चिला जाणार आहे. या अधिवेशनास बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम संबोधित करणार आहेत, अशी माहिती बामसेफचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहूल खैरे यांनी दिली आहे.
आज कल्याणच्या साई नंदन हॉटेलच्या टेरीस हॉलमध्ये बामसेफच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष संजय धाबर्डे यांच्यासह भारतीय मुक्ती मोर्चाचे काम पाहणारे संजय ढिलपे आणि बामसेफचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून ओबीसीची जातिनिहाय जनगणना करीत नाही. ओबीसीची जातिनिहाय जनगणना केली पाहिजे, या मुद्यावर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रत चर्चा केली जाणार आहे. दुसऱ्या सत्रात संघटन तोडफोड करणारा कार्यक्रम पीएमओ स्तरावर चालविला जात आहे. यावरून षडयंत्राची कल्पना यावी, या विषयावर चिंतन केले जाणार आहे. तसेच, धार्मिक धुव्रीकरण - देश विभाजनाचा धोका या विषयावर तिसऱ्या सत्रत चिंतन केले जाणार आहे. या विविध विषयांवर अनिल गेडाम, प्रताप पाटील, राजेंद्र राजदीप, सुजाता चौदंते, प्रा. आर. एस. यादव आणि बामसेफचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय धाबर्डे सहभागी होणार आहेत.
हे अधिवेशन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साई नंदन हॉटेलच्या टेरीस हॉलमध्ये सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान पार पडणार आहे. या अधिवेशनास राज्यभरातील 36 जिल्ह्यातून बामसेफचे जवळपास दोन हजार प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.