बीएसयूपीच्या ३९७ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वाटप
By मुरलीधर भवार | Published: February 13, 2023 06:52 PM2023-02-13T18:52:15+5:302023-02-13T18:52:21+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजने अंतर्गत बांधलेल्या ३९७ घरांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधारी केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजने अंतर्गत बांधलेल्या ३९७ घरांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधारी केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
बीएसयूपी अंतर्गत बांधलेल्या ३९७ घरापैकी २८७ घरे हे महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्यांना दिली जाणार आहेत. दत्तनगर डोंबिवली परिसरातील अपात्र ९० लाभार्थी घरे तात्पुरत्या स्वरुपात सशर्त दिली जाणार आहेत. उंबर्डे आणि इंदिरानगरातील घरांचे वाटप केले जाणार आहे. यूपीए सरकारच्या कारकिर्दीत शहरी गरीबांकरीता घरकूल योजना होती. बीएसयूपी योजने अंतर्गत ७ हजार २७२ घरांपैकी काही घरे बांधलेली आहे. पहिल्या प्रकारात मोकळ्य़ा भूखंडावर बहुमजली इमारती बांधल्या तर दुस:या प्रकारात इनसिटू प्रकल्पात ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे. त्या जागेवर झोपडपट्टी धारकांचा पुनर्विकास करण्याचा समावेश केला आहे.
काही बांधण्याचे काम सुरु आहे. प्रकल्पासाठी एकूण खर्च ६८६ कोटी रुपये आहे. त्याकरीता महापालिकेस केंद्र आणि राज्य सरकारकडून २९६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. उंबर्डे प्रकल्पातील घरे बांधण्यकरीता महापालिकेच्या फंडातून निधी उभारण्यात आला आहे. बांधून पूर्ण झालेल्या घरांपैकी १ हजार २६५ घरे यापूर्वी लाभार्थीना वाटप करण्यात आलेली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थींना भरावी लागणारी रक्कम, म्हाडाला द्यावी लागणारी महापालिकेची रक्कम असे एकूण ५६० कोटी रुपये माफ केले आहेत. त्यामुळे लाभार्थींना ही घरे मोफत मिळणार आहेत.
त्याच बराेबर वाडेघर येथे २६ दश लक्ष लीटर क्षमतेचा मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यावर २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर आंबिवली येथे २१ दश लक्ष लिटर क्षमतेचा मलशुद्धीकरण प्रकल्प २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पाकरीता केंद्र आणि राज्य सरकारने निधी दिला असून ५० टक्के निधीची रक्कम महापालिकेने उभी केली आहे असे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.