बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या बिल्डरला ४० लाखांचा गंडा
By प्रशांत माने | Published: November 27, 2023 06:33 PM2023-11-27T18:33:20+5:302023-11-27T18:33:42+5:30
बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील बिल्डर सुरेंद्र पाटील यांना शनिवारी खंबाळपाडा, टाटा नाका मानपाडा परिसरात सापळा लावून अटक केली.
डोंबिवली: ठाणे खंडणी विरोधी पथकाने अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या बिल्डरला चौघांनी ४० लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत ही बाब समोर आली असून याप्रकरणी बिल्डरच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील बिल्डर सुरेंद्र पाटील यांना शनिवारी खंबाळपाडा, टाटा नाका मानपाडा परिसरात सापळा लावून अटक केली. पाटील यांच्या अंगझडतीत विनापरवाना बाळगलेली एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक गावठी कट्टा आणि ७ जिवंत काडतुस आढळुन आली. त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांना २० ते २५ नोव्हेंबर या कालावधीत चार जणांनी ४० लाखांचा गंडा घातल्याची बाब समोर आली. भारतीय चलनातील नोटांप्रमाणे ख-या नोटा बनवुन देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.
४० लाख रूपयांचे १ करोड ६० लाख रूपये बनवून देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी आगाऊ रक्कम म्हणून पाटील यांच्याकडून १ लाख रूपये स्विकारले गेले होते. उर्वरीत ३९ लाख रूपये मुरबाड येथील के.पी फार्म हाऊस येथे स्विकारण्यात आले. तेथे नोटा बनावट बनविण्याचा बनाव रचण्यात आला. त्याचठिकाणी काही व्यक्ती पोलिस असल्याची बतावणी करीत आल्या आणि त्यांनी छापा टाकून तेथील ४० लाख रूपये उचलून तेथून निघून गेले. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात सुरेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल जाधव, आदेश भोईर, सचिन जाधव, अक्षय गायकवाड अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल हा भिवंडी महापालिकेत सफाई कामगार आहे, अक्षय हा भिवंडी पारिवली ग्रामपंचायतीत लिपीक आहे. सचिन लेबर सप्लायर आहे, तर आदेश हा चालक आहे. या आरोपींपैकी काहीजणांना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान याप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.